Chhatrapati Sambhajinagar news  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar-महामानवाच्या जयंतीत औरंगजेबाचा फोटो; छत्रपती संभाजीनगरात राजकारण तापले

गुन्हा दाखल करा : राजेंद्र जंजाळ यांची मागणी तर कोणते कलम लावणार? : इम्तियाज जलील यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान शहरात एका तरुणाने चक्क औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन डान्स केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुन्हा कोणत्या कलमान्वये दाखल करणार? असा प्रतिप्रश्न करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला दिला आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राजकीय धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत एका तरुणाने हातात औरंगजेबाचे पोस्टर घेऊन डान्स केला. या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एकीकडे जंजाळ यांनी पोलिसांत जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे जलील यांनी कायदेशीर तरतुदींवरून आव्हान दिले आहे. या परस्परविरोधी भूमिकांमुळे आता पोलिस प्रशासन या व्हायरल व्हिडिओप्रकरणी नेमकी काय कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

औरंगजेब महापुरुष नाही, कठोर कारवाई करा : राजेंद्र जंजाळ

औरंगजेब हा कुठलाही महापुरुष नाही. एका महामानवाच्या जयंती उत्सवात अशा व्यक्तीची प्रतिमा झळकावणे अत्यंत चुकीचे आणि संतापजनक आहे. केवळ फोटो झळकावून हा तरुण थांबला नाही, तर त्याने या नृत्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरही अपलोड करून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आपण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ म्हणाले.

संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे : इम्तियाज जलील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाला व्यक्त होण्याची मुभा याच संविधानाने दिली आहे. त्यामुळेच कदाचित एखादा तरुण तो फोटो घेऊन गेला असेल. ज्या नेत्याकडून या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे, त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की, देशाच्या कायद्यातील नेमक्या कोणत्या कलमानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो? मी हे संपूर्ण प्रकरण प्रशासनावर सोडतो, प्रशासन त्यांच्या पातळीवर योग्य तो निर्णय घेईल, असे एमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT