

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ हायकोर्टातील वकिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मांडीत शास्त्राचा घाव असल्याने खून झाल्याचा दाट संशय आहे. ही घटना बुधवारी (दि .१५) रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिथुन भास्कर (४९, रा. आनंद नगर, बीड बायपास) असे मृत वकिलाचे नाव असल्याची माहिती एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अकरावाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांचे सहायक निरीक्षक भारत पाचोळे, जगन्नाथ मेनकुदळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मांडीच्या भागातून प्रचंड रक्तस्त्राव झालेला दिसून आला. त्यांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. घटनास्थळी एसीपी भागीरथी पवार, मनोज पगारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
मृतदेह रस्त्याच्या कडेला, झुडुपात रक्ताचा सडा
भास्कर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मिळून आला. तिथेच त्यांची मोपेड क्रमांक (एम एच २० जीएन १६०८) देखील उभी होती. तिथून १५० मीटर अंतरावर झुडुपात मोठा रक्ताचा सडा पडलेला आढळला. या संपूर्ण मार्गावर देखील त्यांचे रक्त आहे. त्यामुळे झुडपात त्यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर बचावासाठी ते मुख्य रस्त्याकडे धावले. मात्र तिथेच पडून राहिले, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
गाडीला चावी, कागदपत्रेत्यांच्या दुचाकीला चावी देखील तशीच मिळून आली आहे. तसेच गाडीच्या डिकीमध्ये कामाशी संबंधित कागदपत्र मिळून आले आहे. त्यामुळे ते बायपास परिसरात कोणत्या क्लाएंटला भेटण्यासाठी आले असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. भास्कर हे उच्च न्यायालय येथे वकिली करत होते. त्यांचे वडील निवृत्त प्राचार्य, आई मुख्याध्यापिका होत्या. तर बहीण पोलिस दलात अधिकारी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.