Sambhajinagar Rickshaw Strike Impact pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Rickshaw Strike Impact : रिक्षा बंदचा सिटीबसला फायदा, ६७ हजार प्रवाशांनी घेतला लाभ; १८ लाखांचा महसूल

भविष्यात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता सिटीबसच्या ताफ्यात आणखी बस वाढविणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांच्या बंद आंदोलनाने शहरातील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी स्मार्ट सिटीबसवर येऊन पडली. रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी बसचा आधार घेतला आणि सिटीबसच्या प्रवासी संख्येसह उत्पन्नातही मोठी वाढ झाली. सोमवारी (दि. २३) दिवसभरात तब्बल ६७ हजार नागरिकांनी सिटीबसने प्रवास केला. डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा जवळपास ९५ बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या. या वाहतुकीतून महापालिकेला एकाच दिवसात १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

रिक्षाचालक संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा परिणाम सकाळपासूनच जाणवू लागला. रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. जालना रोडसह शहरातील प्रमुख मार्गावरही प्रवाशांची संख्या वाढली. परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध सर्व बस प्रवासी सेवेत लावण्यात आल्या.

डिझेल आणि इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून दिवसभर वाहतूक सुरू ठेवण्यात आली. स्मार्ट सिटीचे मुख्य चालन व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी ही माहिती दिली. एका दिवसात ६७ हजार प्रवाशांची वाहतूक आणि १८ लाख रुपयांचा महसूल मिळाल्याने नियमित दिवसांच्या तुलनेत सिटीबसच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. रिक्षा बंदमुळे प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला असला, तरी सार्वजनिक बससेवेचे महत्त्व या निमित्ताने दिसून आले.

दरम्यान, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाली. काहींना उभ्याने प्रवास करावा लागला. जवळपास ९५ बस उपलब्ध असूनही प्रवाशांची गर्दी नियंत्रित करताना अडचणी आल्या. भविष्यात अशा बंद किंवा गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीबसच्या ताफ्यात आणखी बसची भर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वच बसला गर्दी

रिक्षा बंदच्या दिवशी ९५ बसमधून ६७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. अनेक बसमधील गर्दीमुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागला. भविष्यात प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता सिटीबसच्या ताफ्यात आणखी बस वाढविणे आवश्यक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT