Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime: ब्युटिशियनला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, दोन वर्ष अत्याचार; संभाजीनगरमधील घटना

सलून चालकावर गुन्हा दाखल; दोन वर्षांपासून सुरू होता प्रकार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सलूनमध्ये काम करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना सिडको भागात उघडकीस आली आहे. आरोपी हा सलून चालक असून, तो आधीच विवाहित असतानाही त्याने तरुणीची फसवणूक करून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने तरुणीला मारहाण करत लग्नास नकार दिला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनेश्वर फकीरराव पंडीत (रा. पिसादेवी) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी एका २५ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ती वनेश्वर पंडित याच्या हडको येथील सलूनमध्ये ब्युटिशियन म्हणून काम करत होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

वनेश्वरने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि सलूनमध्येच तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही काळानंतर पीडित तरुणीला समजले की, वनेश्वर हा आधीच विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. तिने याबाबत जाब विचारला असता, माझे माझ्या पत्नीशी पटत नाही, मी तिला घटस्फोट देणार आहे आणि तुझ्याशीच लग्न करणार आहे, अशी बतावणी करून त्याने तिला गप्प केले. त्यानंतर दोघांनी मिळून सलूनची दुसरी शाखा सुरू केली. तिथेही त्याने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले.

वनेश्वर केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे आणि लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर, तरुणीने स्वतःची पार्टनरशिप काढून घेतली आणि ते सलून स्वतःच्या नावावर केले. तिने त्याच्याशी संपर्कही तोडला. मात्र, तो वारंवार येऊन तिला भेटत असे. तू पत्नीला नांदायला आणले आहे, तर माझ्याशी कधी लग्न करणार? असे विचारल्यावर त्याने मी तिला घटस्फोट देण्यासाठीच आणले आहे, असे खोटे सांगून पुन्हा फुलंब्री येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

६ सप्टेंबर रोजी तरुणीने पुन्हा लग्नाचा विषय काढला असता, वनेश्वरने तिला शिवीगाळ करत हाताचापट्यांनी मारहाण केली आणि लग्नास स्पष्ट नकार दिला. या फसवणुकीनंतर तरुणीने बुधवारी (दि. ९) सिडको ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक योगेश गायकवाड हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT