छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस येथून कुटुंबीयांसोबत मोमोज खाऊन घरी परतत असताना, हायकोर्ट ते हनुमाननगर रस्त्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या टोळक्याने एका कुटुंबाची कार अडवून भररस्त्यात दहशत माजवली. दुचाकी आडवी लावून गुंडांनी बाटली फेकून कारची काच फोडली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शर्टची कॉलर पकडून तिला जबरदस्तीने गाडीबाहेर ओढत शिवीगाळ व हुज्जत घातली. हा प्रकार रविवारी (दि. १ नोव्हेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपी शरद आणि त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिकनगर येथील १७ वर्षीय हिच्या तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्यादी, तिचे वडील आणि भाऊ हे तिघे वडिलांच्या मित्राच्या अर्टिगा कारने कॅनॉट प्लेस येथे मोमोज खाण्यासाठी गेले होते.
रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास ते कारने घराकडे परत निघाले. त्यांची कार हायकोर्टाकडून हनुमाननगरकडे येत असताना, अचानक दोन दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी थेट कारच्या समोर दुचाकी आडवी लावून अडविले. कार थांबताच अल्पवयीन मुलीची कॉलर पकडून बाहेर खेचले.
काच फुटल्यानंतर कारमधील कुटुंबीय भयभीत झाले असतानाच, त्या गुंडांनी गाडीतील सदस्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरू केली. याच दरम्यान हल्लेखोराने थेट कारमध्ये हात घालून १७ वर्षीय मुलीच्या शर्टची कॉलर पकडून तिला ओढून गाडीच्या बाहेर खेचले. या झटापटीत तिच्या शर्टच्या कॉलरखालील बटनही तुटले. घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासून दुचाकीवरील टोळक्याचा माग काढत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार विजय लकवाल करत आहेत.
दुचाकीवरील गुंडांनी कारच्या दिशेने धाव घेतली आणि मुलगी व तिच्या वडिलांना जबरदस्तीने कारबाहेर ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या टोळक्यातील इतर तरुण त्यातील एका जाडसर आणि काळ्या रंगाच्या व्यक्तीला शरद... शरद... अशा नावाने हाक मारत होते. वडिलांनी कारचा दरवाजा न उघडता बाहेर येण्यास नकार दिला असता, हल्लेखोरांनी हातातील काचेची बाटली मारून कारची समोरील काच फोडली.