छत्रपती संभाजीनगर : मुख्य बसस्थानकाची दुरवस्था आणि जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून खडी आणि कच अंथरण्यात आली, तरीही बसस्थानकातील खड्डे कायम आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झाला असून, प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच आताही अडचणींतून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षांवर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दररोज मुख्य बसस्थानकातून हजारो प्रवासी आणि शेकडो बसेसची ये-जा असते. येथील खड्ड्यांमुळे बसचे नुकसान होण्यासोबतच प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून बसस्थानकातील खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून खड्ड्यांमध्ये खडी आणि कच (दगडाची भुकटी/मुरूम) टाकण्यात आली. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि दबाई (रोलिंग) न केल्यामुळे काही दिवसांतच या परिसरातील खड्यांनी डोके वर काढले आहे. एवढेच नाही तर खडी आणि कच परिसरात विखुरल्यामुळे प्रवाशांना पायी चालने जिकिरीचे बनले आहे. यातून अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सखोल चौकशीची मागणी: एसटीच्या पैशांची अशी उधळपट्टी होत असल्याने, या संपूर्ण कामाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर व त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे.
खड्ड्यांचे साम्राज्य कायम
बसस्थानकातून एसटी बस आत-बाहेर जाताना ही उघडी खडी उडून प्रवाशांना लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, कच आणि मातीमुळे संपूर्ण परिसरात धूळ पसरली आहे. खड्डे बुजले तर नाहीतच, उलट विखुरलेल्या खडीमुळे चालकांना बस चालवणे अधिक जिकिरीचे झाले आहे. लाखो रुपये खर्चुनही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडले आहेत. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने थातूरमातूर काम करून बिले उचलण्याची घाई करत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.