Sambhajinagar blackbuck meat smuggling pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar blackbuck meat smuggling : सुसाट कार उलटल्याने काळवीट मांसाच्या तस्करीचा पर्दाफाश

धुळे-सोलापूर हायवेवरील घटना ; चौघांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गावर एका कारचा अपघात झाल्यानंतर, त्या वाहनातून चक्क काळविटाच्या (हरिण) मांसाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघातग्रस्त कारमध्ये रक्ताने माखलेली गोणी पाहून पोलिसांना संशय आला. मात्र, गोणी उघडण्यास सांगताच आरोपीने पोलिसांना गुंगारा देत महामार्गावरून धूम ठोकली. गोणीत काळविटाचे मांस आढळून आले.

मुस्तफा अकबर कुरेशी (२४, रा. सातारा परिसर), शफिक सय्यद (३२, रा. बुलढाणा), राजा शेख (४५, रा. सुधाकरनगर) आणि असलाफ नूर कुरेशी (२५, रा. आरेफ कॉलनी), अशी आरोपींची नावे आहेत. यातील मुस्तफा पळून गेला तर उर्वरित तिघे रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील एसआरपीएफ कॅम्प (ग्रुप १४ आयआरबी बटालियन) पेट्रोल पंपाजवळ एका व्हॅगनार कारचा (एम एच-०२-एएल-८९८२) अपघात झाल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, हवालदार राहुल रणवीर आणि अंमलदार वैद्य यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोलिसांना मुस्तफा कुरेशी हा तरुण आढळला. त्याने पोलिसांना सांगितले की, कार चालवणारा शफिक सय्यद आणि अन्य दोन साथीदार राजा शेख, असलाफ कुरेशी हे अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात गेले आहेत.

नमुने तपासणीसाठी पाठवले

या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे अवैध कत्तल पथक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मांसाची पाहणी करून त्याचे नमुने (सॅम्पल) तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

रक्ताळलेली गोणी पाहून संशय बळावला

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता, आतमध्ये एक संशयास्पद गोणी आढळून आली. त्यातून रक्त पाझरत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी मुस्तफा याला ती गोणी उघडून दाखवण्यास सांगितले. मात्र, पोलिसांचा ससेमिरा पाहून आणि बिंग फुटण्याच्या भीतीने त्याने महामार्गावरील गर्दीचा फायदा घेत तेथून पळ काढला. पोलिसांनी गोणी उघडून पाहिली असता, त्यात काळवीट हरणाचे मांस असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT