पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस स्टेशन समोर मुरूम, वाळू, खडी वाहतूक करणाऱ्या टिप्परने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना आज (दि. २९) दुपारी १ च्या सुमारास घडली. सोहम विष्णू जाधव (वय १७, रा. कृष्णापुरी, बिडकीन) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तरूणीचे नाव स्नेहल संदीप राठोड (वय १६, रा. फारोळा तांडा, बिडकीन) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी एक च्या दरम्यान बिडकीन पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्यावरून वाळू खडी मुरूम वाहतूक करणारा (एम.एच.जी.सी ९८००) टिप्पर निलजगाव फाट्यावरून एमआयडीसीकडे जात होता. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर निलजगाव फाट्यावर (एम.एच. जी.जी ७६५९) या स्कुटीला टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात सोहम आणि स्नेहल गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी व नातेवाईकांनी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु, सोहम यास वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता जोंधळे यांनी तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी स्नेहलवर उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, टिप्पर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, जमादार संदीप धनेधर करीत आहे.