ठाकरे सेनेचे नेते आमदार अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे आमदार अब्दूल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर झालेली अनपेक्षित भेट Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Ambadas Danve Abdul Sattar Meet | समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे - अब्दुल सत्तार यांची गळाभेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दोन्ही शिवसेनांनी पुन्हा एकत्र आले पाहिजे, अशी भावना दोघांनी व्यक्त केली होती

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Political News

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे सेनेचे नेते आमदार अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे आमदार अब्दूल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर झालेली अनपेक्षित भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची आपुलकीने गळाभेट घेत संवाद साधला.

दोन्ही नेत्यांनी कालच वेगवेगळ्या ठिकाणी बोलताना, दोन्ही शिवसेनांनी पुन्हा एकत्र आले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असे दोन पक्ष निर्माण झाले. तेव्हापासून दोन्ही पक्षांतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कायम संघर्षाचे वातावरण राहिलेले आहे.

मात्र, मंगळवारी समृद्धी महामार्गावर शिंदे सेनेचे आमदार अब्दूल सत्तार आणि ठाकरे सेनेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची भेट झाली आणि दोघांनी गळाभेट घेत एकमेकांशी सौहार्दपूर्ण संवाद साधला. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

अब्दूल सत्तार हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मुंबईला निघाले होते. तर अंबादास दानवे हे शिर्डी येथे जात होते. एका ठिकाणी समोरासमोर आल्यावर त्यांनी गाडी थांबवून एकमेकांशी संवाद साधला. यावेळी दोघांनी गळाभेटही घेतली.

विधान परिषदेची औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीत भाजपला सुटली. त्यानंतर शिवसेनेचे आमदार अब्दूल सत्तार यांचे चिरंजीव अब्दूल सत्तार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल झाला त्याच दिवशी आमदार सत्तार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

भाजपने आधी ठाकरेंची शिवसेना संपविली आणि आता ते आमची शिवसेना संपवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच आता वाचायचे असेल तर दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला हवे, अशी भावना व्यक्त केली. तर दुसरीकडे ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही कालच वेगळ्या ठिकाणी बोलताना दोन्ही शिवसेनेने एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT