छत्रपती संभाजीनगर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान गजापूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये 'एमआयएम'ने विभागीय आयुक्तालयासमोर शुक्रवारी (दि.१९) आंदोलन केले. माजी खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलनानंतर काही टवाळखोरांनी चांदणे चौकात आक्षेपार्ह घोषणाबाजी करून त्याला गालबोट लावले. हा प्रकार समजताच उपायुक्त नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांच्या पथकांनी टवाळखोरांची धरपकड करत त्यांना झोडपून काढले. गल्लोगल्ली सर्च मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त केला.
शहरातील विभागीय आयुक्तालयासमोरील आंदोलन शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडले. आंदोलक परतीच्या मार्गावर असताना २० ते २५ जणांच्या टोळक्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चांदणे चौकात आक्षेपार्ह घोषणाबाजी करत धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या टवाळखोरांची धरपकड करत लाठीमार केला. यावेळी गल्लीबोळात पळालेल्या टवाळखोरांच्या मागे धावून पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी तत्काळ किराडपुरा आणि अन्य भागात धाव घेत टवाळखोरांचा शोध घेतला.
टवाळखोरांनी पोलिसांच्या विरोधात आणि काही आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत त्यांची धरपकड करत त्यांना लाठीमार केला. त्यानंतर पसार झालेल्या टवाळखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, विशेष शाखेसह, सिटी चौक पोलिसांचे पथक किराडपुरा, शहागंज भागात कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत. या प्रकरणी टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले. दरम्यान, किराडपुरा येथील श्रीराम मंदिरसमोर दंगा काबू पथक आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.