छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर पडलेले तडे वाचविण्याच्या नादात दाम्पत्याची दुचाकी स्लिप होऊन शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी एसआरपीएफ कॅम्पजवळ अपघात झाला. यात पती व चिमुकली बाजूला फेकल्या गेले, तर तिथेच पडलेली महिला मागून आलेल्या भरधाव ट्रकखाली चिरडल्या जाऊन त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा बळी गेल्याचा आरोप करत रास्ता रोको करण्यात आला. दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
प्रीती शिवाजी बोंगाने (२९, रा. साई टेकडीमागे) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या प्रीती यांना शुक्रवारी (दि.7) सायंकाळी त्यांचे पती शिवाजी हे दुचाकीवरून घरी घेऊन जात होते. त्यांच्यासोबत ५ वर्षांची चिमुकलीही होती. एसआरपीएफ कॅम्पजवळ रस्त्यावर पडलेले तडे चुकवताना अचानक त्यांची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे पती व मुलगी दुसऱ्या बाजूला फेकले गेले. तर प्रीती या दुसऱ्या बाजूला पडल्या. त्याचवेळी त्यांच्यामागून एक भरधाव ट्रक येत होता. अचानक घडलेल्या अपघातामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकचे ब्रेक न लागल्याने ट्रक प्रीती यांच्या अंगावरून गेला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक भंडारे हे पथकासह, तर चिकलठाणा पोलिस हद्द असल्याने ते चिकलठाणा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर संतप्त नातेवाइकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.
अपघातानंतर संतप्त नातेवाइकांचा रास्ता रोको
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे निरापराध महिलेचा जीव गेला. त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत संतप्त नातेवाइकांनी दोन्ही बाजूंनी रास्ता रोको केला. यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू होते.
दुरुस्तीच्या कामांत रस्त्याला तडे
या महामार्गावर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामात दोन आठवड्यांपासून रस्त्याला प्रमाणात तडे गेले आहेत. असे असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इशारा फलक किंवा अडथळा लावण्यात आलेला नव्हता. याच दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.