Abhijeet Dipke  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Abhijeet Dipke | ...तर विद्यार्थी सरकार बदलण्याची ताकदही दाखवतील: अभिजीत दिपके यांचा इशारा

दिल्लीतील आंदोलनानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगरात आगमन; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke visit Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगरात दाखल झालेले कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी बुधवारी (दि.२९) केंद्र सरकारवर टीका केली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर विविध राज्यांत पोलिसांकडून कारवाई होत असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवू नये, असे त्यांनी म्हटले. तसेच, "सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दुर्लक्षित केला, तर विद्यार्थी सरकारही बदलू शकतात," असा इशाराही त्यांनी दिला.

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील युवक, विशेषतः जेन-झी पिढीने आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा दिपके यांनी केला. त्यानंतर तब्बल ४० दिवसांनी ते प्रथमच महाराष्ट्रात आले असता छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

माध्यमांशी संवाद साधताना दिपके म्हणाले, "४० दिवसांच्या संघर्षानंतर आज मी माझ्या घरी परतलो आहे. या आंदोलनाला मिळालेले यश हा देशातील विद्यार्थ्यांचा विजय आहे. विद्यार्थ्यांवर त्यांच्या घरी जाऊन कारवाई करणे योग्य नाही. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागवले जाऊ नये. सरकारने अद्यापही धडा घेतला नाही, तर विद्यार्थी सरकार बदलण्याची ताकदही दाखवतील."

शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

विमानतळावर आगमनानंतर अभिजीत दिपके यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून बजाजनगर येथील निवासस्थानी प्रस्थान केले.

'आंदोलनाच्या काळात त्याची कायम काळजी वाटत होती'

अभिजीत दिपके घरी परतणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या आईने आनंद व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अभिजीत घरी परतत आहे, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांसाठी त्याने केलेले काम अभिमानास्पद आहे. आंदोलनाच्या संपूर्ण काळात आम्हाला त्याची कायम काळजी वाटत होती," असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT