छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील साडेपाच वर्षांच्या प्रशासक काळात शाळेच्या मैदानांसह विविध ८५ खुल्या जागा प्रशासनाने खाजगी विकासकांच्या घशात घातल्या आहेत. या सर्व जागेचे तातडीने सर्वेक्षण करून त्या, सुरक्षित करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत माजी महापौर तथा नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी महापौर समीर राजुरकर यांना केली. तसेच बीओटी प्रकल्पांच्या कामांचेही सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
महापालिकेतील प्रशासकराजमध्ये अनेक वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आल्याची ओरड यापूर्वीच आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. त्यानंतर आता नगरसेवक तुपे यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर सवाल उपस्थित करीत साडेपाच वर्षांतील खुल्या जागांच्या लीजबाबत प्रशासनाकडे विचारणा केली.
शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वीच त्यांनी याबाबत महापौर समीर राजुरकर यांना प्रश्नावली देत त्यावर खुलासा करण्याबाबत मागणी केली होती. त्यात तुपे यांना प्रशासनाकडून लेखी माहिती देण्यात आली. परंतु या माहितीवर त्यांनी शुक्रवारी सर्वसाध -ारण सभेत प्रशासनापुढे उपप्रश्न उपस्थित करीत माहिती देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, मागील साडेपाच वर्षांत प्रशासनाने ज्या खुल्या जागा खासगी विकासकांना दिल्या आहेत, त्यातील बहुतांश जागा महापालिका शाळेच्या मैदानाचा समावेश आहे.
महापालिकेत गरिबांची मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच महापालिकेच्या या मैदानावर गरिबांचीच नव्हे तर सर्वसामन्यांची मुले खेळतात. असे असताना महापालिकेने हीच मैदाने खासगी विकासकांच्या घशात घातली आहेत. त्याठिकाणी आज अनेकांनी टर्फ उभारले आहेत.या टर्फमध्ये सामान्यांच्या मुलांना प्रवेश नसतो. त्यामुळे कोणत्या जागा या विकासकांना द्यायला हव्या होत्या, याचा विचार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक होते, असा टोलाही नगरसेवक तुपे यांनी प्रशासनाला लगावला. या जागेचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे. जागा दिल्या की त्या गेल्या, असेच आजपर्यंत झाले आहे. त्यामुळे पुन्हा हा प्रकार घडू नये, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.
डीमार्टच्या जागेचे सर्वेक्षण करा
शहानुरवाडी येथील पीर बाजारच्या जागेलगतचे काही क्षेत्र महापालिकेने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना दिले आहे. या जागेत युरोपियन बाजार होणार होता, परंतु हे काम विकासकाने अर्धवटच सोडले अन् तरीही त्याला दंड आकारला नाही, असे म्हणत डीमार्टला दिलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची माणगीही तुपे यांनी केली.