Chhatrapati Sambhajinagar vehicle theft pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar vehicle theft : सहा महिन्यांत ४८४ वाहने लंपास

पोलिसांना सापडली केवळ ८३ : मोक्का टाळण्यासाठी चोरांचा 'एकला चलो रे'चा नारा

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या वाहनचोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांच्या घामाच्या पैशातून घेतलेली वाहने घरापुढून आणि पार्किंगमधून डोळ्यांदेखत क्षणात गायब होत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत शहरातून तब्बल ४८४ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी केवळ ८३ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे उर्वरित ४०१ वाहने गेली कुठे? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

शहरात इतर गुन्ह्यापेक्षा वाहन चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल ४८४ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याचाच अर्थ, शहरातून दर महिन्याला सरासरी ८० तर दररोज २ ते ३ वाहने राजरोसपणे चोरीला जात आहेत. वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण एवढे मोठे असताना, पोलिसांकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे (डिटेक्शन) प्रमाण मात्र केवळ १७ टक्के (४८४ पैकी ८३ उघड) इतके निराशाजनक आहे.

मोक्‌का'ला हुलकावणी आणि सहज जामीन

कायद्यातील पळवाटांचा या भामट्यांनी पुरेपूर अभ्यास केला आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यात पकडले गेलो तरी शिक्षा कमी आहे आणि तत्काळ जामीन मिळतो, याची सराईत चोरांना पक्की खात्री झाली आहे. विशेष म्हणजे, टोळीने गुन्हे केल्यास पोलिस संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करू शकतात, हे ओळखून सराईत चोरांनी आता टोळी बनवणेच टाळले आहे. पोलिसांना 'मोक्का' लावता येऊ नये यासाठी हे चोर एकटे किंवा जास्तीत जास्त दोघांच्या साथीने चोऱ्या करत आहेत.

चोरीच्या दुचाकींची अशी लावतात विल्हेवाट

सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावणारी एक सिंडिकेट कार्यरत आहे. अनेक दुचाकींचे काही सुटे भाग करून ते भंगारात विकले जातात. तर काही दुचाकींची ओळख खोलून भंगाराच्या स्वरूपात थेट मोठ्या बॉयलरमध्ये वितळवल्या जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, एखादा वाहनचोर पकडला तरी पोलिसांचा तपास फक्त त्याच्यापुरताच मर्यादित राहतो. चोरीच्या गाड्यांची विल्हेवाट लावणाऱ्या या माफियांपर्यंत पोलिसांचे हात कधीच पोहोचले नाही.

पेट्रोल संपेपर्यंत मौजमजा अन् ग्रामीण भागात विक्री

सराईत गुन्हेगारांसोबतच नवख्या चोरांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक नवखे चोर चोरीची दुचाकी थेट ग्रामीण भागात नेतात आणि तिथे विनाकागदपत्रे कवडीमोल भावाने तिची विक्री करतात. तर दुसरीकडे, काही टवाळखोर केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरतात, दिवसभर शहरात उंडारतात आणि गाडीतील पेट्रोल संपेपर्यंत वापरून ती रस्त्यातच बेवारस सोडून पळ काढतात.

हायटेक कार चोरांच्या टोळ्या

कार चोराच्या दुचाकीच नव्हे, तर महागड्या कार चोरी करणाऱ्या टोळ्याही शहरात सक्रिय आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत 'सेन्सर हॅकिंग' किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने महागड्या कारचे लॉक क्षणात उघडून त्या पळवल्या जात आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

  • डबल लॉक सिस्टीम : हँडल लॉकसोबतच चाकाला किंवा डिस्क ब्रेकसाठी अतिरिक्त लॉक वापरावे.

  • जीपीएस ट्रॅकर : वाहनामध्ये छुप्या पद्धतीने जीपीएस ट्रॅकर बसवावा, जेणेकरून गाडी चोरीला गेल्यास तिचे लोकेशन तत्काळ समजू शकेल.

  • पार्किंगची जागा : वाहने नेहमी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टप्प्यात किंवा सुरक्षित, उजेड असलेल्या ठिकाणीच पार्क करावीत.

  • अलार्म सिस्टीम : हायटेक गाड्यांसाठी अँटी थेफ्ट अलार्म आवर्जून बसवून घ्यावा.

पोलिसांनी या उपाययोजना करण्याची गरज ?

  • भंगार बाजारांचे ऑडिट : चोरीच्या गाड्या जिथे कापल्या जातात, त्या गॅरेज आणि भंगार व्यावसायिकांवर अचानक छापे मारून तपासणी करणे आवश्यक आहे.

  • रात्रीची गस्त आणि नाकाबंदी शहराबाहेर जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर आणि विशेषतः ग्रामीण भागात जाणाऱ्या मार्गावर रात्रीची कडक नाकाबंदी वाढवावी.

  • सराईतांवर 'वॉच': जामिनावर सुटलेल्या जुन्या वाहनचोरांचे सध्याचे लोकेशन आणि त्यांचे उद्योग तपासण्यासाठी 'स्पेशल ड्राईव्ह' राबवावा.

चोरटे पैशांचे करतात काय ?

  • व्यसनाधीनता आणि शौक अनेक तरुण केवळ महागड्या ड्रग्जची, दारूची आणि इतर व्यसनांची भूक भागवण्यासाठी दुचाकी चोरतात.

  • झटपट पैसा कमी कष्टात हातात खेळता पैसा येत असल्याने, एकदा चोरीची सवय लागली की जामीन मिळाल्यावर ते पुन्हा त्याच मार्गाकडे वळतात. गर्लफ्रेंडचे लाड पुखणे किंवा महागड्या हॉटेल्समध्ये पार्ध्वा यासाठी हा पैसा उडवला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT