रंगा नायक यांना नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती देताना कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गोगलुथू सोबत मुख्य अभियंता मनीषा पलांडे, मनपाचे ए. बी. देशमुख. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar water supply : पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर शेवटची डेडलाईन

नायक यांचा कंत्राटदाराला इशारा, १९०० कि.मी. जलवाहिन्या; ५५ जलकुंभांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आता कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने कुठलाही वेळकाढूपणा न करता, येत्या डिसेंबरपासून शहराला पूर्ण क्षमतेने म्हणजेच ३९२ एमएलडी पाणी द्यावे. त्यासोबतच १९१५ किलोमीटर अंतरातील वितरण जलवाहिन्या टाकणे आणि ५५ जलकुंभ तयार करण्याचे कामही पूर्ण करावे, असा इशारा मंगळवारी (दि.२१) पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजेपी) सदस्य सचिव रंगा नायक यांनी दिला.

यावेळी महापालिका आयुक्त अमोल येडगे, एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतील आढावा बैठकीतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक यांना पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी (दि.२०) हे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले.

सोमवारी त्यांनी जॅकवेल, जलशुध्दीकरण केंद्र, १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे सुरू असलेले काम आणि सिडको एन-५ येथील जलकुंभाची पाहणी केली. या पाहणीनंतर मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त अमोल येडगेही उपस्थित होते.

या बैठकीबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दीड ते दोन तास योजनेच्या कामावर प्राधिकरणाच्या कार्यालयात काथ्याकूट झाला. त्यानंतर कामाची टक्केवारी, प्रत्यक्षात सुरू असलेले काम आणि त्यावर उपलब्ध कामगारांची संख्या याबाबतही बैठकीत वादळी चर्चा झाली.

त्यानंतर सदस्य सचिव रंगा नायक यांनी कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला शेवटची डेडलाईन दिली. ते म्हणाले की, पाणीपुरवठा योजना ९२ एमएलडी क्षमतेची आहे. डिसेंबर अखेरपर्यंत योजनेचे पूर्ण क्षमतेचे काम कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे. जलकुंभांची कामे सुरूच राहतील. या कामांमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना बजावले. दरम्यान, आतापर्यंतच्या एकही डेडलाईन कंत्राटदाराने पाळलेली नाही. ही डेडलाईन न पाळल्यास कारवाई होईल, असेही अधिकारी, कंत्राटदाराला त्यांनी बजावले.

२ जलकुंभांमध्ये घेणार पाणी

नक्षत्रवाडी येथील एमबीआरपासून टाकलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून बुधवारी (दि.२२) सिडको एन-५ येथील जलकुंभात आणि मिसारवाडी जलकुंभामध्ये पाणी घेऊन चाचणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरही क्रॉसकनेक्शन करण्याचे आदेश सचिव रंगा नायक यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT