येत्या दहा दिवसांत नक्षत्रवाडीत पाणी धडकणार pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : येत्या दहा दिवसांत नक्षत्रवाडीत पाणी धडकणार

एमजेपीची युद्धपातळीवर तयारी, कौडगावातील स्कोर व्हॉल्व्हची दुरुस्ती पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचा पहिला २०० एमएलडी पाणी विरतणाचा टप्पा येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बुधवार (दि.१) पर्यंत मुख्य जलवाहिनीतून जायकवाडीहून कौडगावपर्यंत पाणी दाखल झाले. मात्र अचानक स्कोर व्हॉल्व्हला गळती अढळल्याने दुरुस्तीवर भर दिला. आज शनिवारी (दि.४) सकाळपासून पुन्हा चाचणी सुरू होणार असून, दहा दिवसांत पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणापर्यंत दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात आले. त्यानंतर जॅकवेलवर बसविण्यात आलेल्या दोन्ही ३७०० अश्वशक्ती क्षमतेच्या पंपाद्वारे पाणी उपशाची चाचणी घेण्यात आली.

दोन्ही पंपांतून यशस्वी पाणी उपशाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पहिल्या दिवशी संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पाणी आणण्यात आले. त्यानंतर दररोज चाचणी घेऊन सहा ते सात तास पंप सुरूच ठेवण्यात आला. बुधवारपर्यंत पाणी कौडगावपर्यंत दाखल झाले. त्यापूर्वीच २८ मार्च रोजी कारकीन येथे मुख्य जलवाहिनीच्या जॉइंटचे वेल्डिग निखळले होते. या दुरुस्तीसाठी एमजेपी आणि जीव्हीपीआरच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करीत पुन्हा चाचणी घेतली.

हे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणीला यशस्वीरीत्या सुरुवात करण्यात आली. दरम्यान, बुधवारी पाणी कौडगावपर्यंत दाखल झाले, परंतु त्याच वेळी अचानक स्कोर व्हॉल्व्हला गळती असल्याचे अडळले. अगोदर नटबोल्ट टाईट करण्यात आले. परंतु त्यानंतरही गळती न थांबल्याने स्कोर व्हॉल्व्हच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले. या दुरुस्तीला दोन दिवसांचा अवधी लागला.

शुक्रवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्याने रात्रीतून चाचणी घेण्याची तयारी एमजेपी व जीव्हीपीआरने दर्शविली होती, परंतु शनिवारी सकाळीच चाचणी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता ही चाचणी शनिवारी सकाळपासून सुरू होणार आहे. गळती आणि वेल्डिग निखळण्यासारख्या अडचणी आल्या नाही, तर येत्या दहा दिवसांत पाणी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येईल, असेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा विस्कळीत

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह शुक्रवारी (दि.३) फारोळाजवळ अचानक निखळला. त्यामुळे सायंकाळी ६.४० वाजेपासून या जलवाहिनीतून शहराच्या दिशेने येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. आता जलवाहिनी रिकामी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे पहाटेच दुरुस्ती पूर्ण होऊन शहराला पाणीपुरवठा सुरू होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जुन्या शहरातील पाण्याचे टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT