Sambhajinagar crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar crime : सराईत जेलमध्ये; नवख्यांकडून ड्रग्जचा गोरखधंदा

नशेच्या २१० 'बटन' गोळ्यांसह पेडलर गजाआड; एनडीपीएस पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सराईत अमली पदार्थ तस्करांना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जेलची हवा खाऊ घातल्याने, आता त्यांच्या जागी झटपट पैसा कमावण्यासाठी नवखे तरुण या गोरखधंद्यात उतरल्याचे भयंकर वास्तव समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना 'एमडी' ड्रग्स विकणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर, गुरुवारी (दि. २७) रात्री गुन्हे शाखेच्या 'एनडीपीएस' पथकाने औरंगपुरा भागातील जिल्हा परिषद मैदानाजवळ छापा मारला. यावेळी नशेच्या गोळ्या (बटन) विकणाऱ्या एका २० वर्षीय पेडलरच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्याच्याकडून २१० गुंगीकारक गोळ्या आणि मोबाईल असा ५१ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राहिल शेख महेमुद शेख (२०, रा. हुसेन कॉलनी, गल्ली नं. १, पुंडलिकनगर) असे या अटक करण्यात आलेल्या पेडलरचे नाव आहे. तर, कारवाईची कुणकुण लागताच या टोळीचा मुख्य पुरवठादार जुबेर ऊर्फ जुनेद समशेर पठाण (रा. हुसेन कॉलनी, न्यायनगर) हा पसार झाला आहे.जिल्हा परिषद मैदानाच्या गेटजवळ एक तरुण नशेच्या गोळ्या विकण्यासाठी उभा असल्याची माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली होती. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक मनोज पैठणे आणि पंचांना सोबत घेऊन पथकाने रात्री १० वाजता तेथे अचानक छापा मारला.

पोलिसांना पाहताच राहिलने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत 'निट्रोसॅन १०' या गुंगीकारक औषधाच्या २१ स्ट्रीप्स आणि एक 'आयफोन १३' असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे आणि विठ्ठल पवार यांच्या पथकाने केली.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थ विरोधी प्रभावी मोहिमा राबवून शहरातील अनेक मोठ्या टोळ्यांना जेलमध्ये टाकले आहे. मुख्य पुरवठादारांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे शहरात अमली पदार्थ सहज मिळणे कठीण झाले होते. मात्र, याच संधीचा फायदा घेत आणि व्यसनाधीन तरुणांची, विदयार्थ्यांची गरज ओळखून, त्यांना ड्रग्ज, नशेच्या गोळ्या आणि गांजा पुरवणारी नवख्या तस्करांची एक नवी फळी शहरात सक्रिय झाल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. छावणी पोलिसांनीही डॉक्टरांच्या नावाने बनावट लेटरहेड बनवून मेडिकलवरून गोळ्या खरेदी करणाऱ्या तरुणाला नुकतीच अटक केली होती.

८० ची स्ट्रीप हजारला

'नट्रिोसॅन १०' या गोळ्यांची एक स्ट्रीप (१० गोळ्या) बाजारात अवघ्या ८० रुपयांना मिळते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती कोणालाही दिली जात नाही. नशेखोर तरुण याच गोळ्यांचा (बटन) वापर नशा करण्यासाठी करतात. पेडलर राहिल हीच ८० रुपयांची स्ट्रीप नशेखोरांना तब्बल ८०० ते १००० रुपयांना विकून मोठी काळी कमाई करत होता. त्याने हा माल जुबेर ऊर्फ जुनेद याच्याकडून आणल्याची कबुली दिली.

राहिलने दोन दिवसांपूर्वीच जुबेरकडून गोळ्यांचा साठा घेतला होता आणि गुरुवारी रात्री जुबेर आणखी माल घेऊन त्याच मैदानावर येणार होता. पण पोलिसांनी त्याआधीच राहिलला उचलले. याची भनक लागल्याने जुबेर सावध झाला आणि त्याने पळ काढला. याज् या जुबेरचे शहरात आणखी काही नवखे पेडलर्स सक्रिय असून, पोलिस आता त्यांच्याही मागावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT