Sambhaji Nagar Municipal Election: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोन क्रमांक एकमधील निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका महिला उमेदवाराचा अधिकृत 'बी-फॉर्म' तांत्रिक कारणास्तव लपवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असताना झोन क्रमांक एकमध्ये भाजपच्या महिला उमेदवाराने आपला अधिकृत एबी फॉर्म (A-B Form) जमा केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी हा फॉर्म अर्जासोबत जोडण्याऐवजी तो बाजूला लपवून ठेवल्याचा आरोप उमेदवाराने केला आहे. जेव्हा उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली, तेव्हा संबंधित महिला उमेदवाराला 'अपक्ष' म्हणून घोषित करण्यात आले आणि भाजपचे 'कमळ' हे चिन्ह नाकारण्यात आले.
आपला अधिकृत पक्षीय फॉर्म दिलेला असतानाही अपक्ष घोषित केल्याचे समजताच भाजप कार्यकर्ते आणि उमेदवार संतप्त झाले. व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसत आहेत. "आम्ही दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला, तर मग तो अर्जात का लावला नाही? जर तो जोडायचा नव्हता, तर तो वेळेत परत का दिला नाही? तुम्ही गरिबाच्या पोटावर पाय देत आहात," अशा प्रश्नांची सरबत्ती करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
या संदर्भात बोलताना भाजपच्या महिला उमेदवाराने आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "मी वेळेत एबी फॉर्म जमा केला होता, पण अधिकाऱ्यांनी तो खाली लपवून ठेवला आणि माझ्यावर अन्याय केला. मी अनुसूचित जातीची महिला असल्याने मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. माझा फॉर्म लपवल्यामुळे मला अपक्ष ठरवण्यात आले असून पक्षाचे चिन्ह रद्द झाले आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी."
हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता भाजप उमेदवाराने वरिष्ठांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांकडे या प्रकरणाची लेखी तक्रार केली जाणार असून, व्हायरल व्हिडिओ हा पुरावा म्हणून सादर केला जाणार आहे. आता निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.