अजिंठा : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील अजिंठा येथे एका पर्यटक युट्यूबरला केवळ 'छत्रपती संभाजीनगर' असे नाव उच्चारल्याने मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, स्थानिक विक्रेत्याच्या या वर्तनामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे एक युट्यूबर पर्यटक ब्लॉगसाठी व्हिडिओ शूट करत होता. त्यावेळी त्याने यावेळी 'छत्रपती संभाजीनगर' असे नाव घेतले. हे ऐकताच रस्त्याच्या बाजूला असलेल्या केळी विक्रेत्याने 'औरंगाबाद आहे, छत्रपती संभाजीनगर नाही' असे म्हणत त्या युट्यूबरला मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करण्यात आले असले तरी, अजूनही काही नागरिक हे नाव स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे अशा घटनांमुळे नाव बदलावरून वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. या घटनेमुळे पर्यटक आणि स्थानिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, अजिंठा लेणीसारखी जागतिक वारसा स्थळे येथे आहेत. अशा ठिकाणी पर्यटकांना अशा प्रकारच्या धमक्या मिळणे दुर्दैवी आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकतेा आणि पर्यटन क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.