Chapati now added to the school nutrition meal
छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहारातील नव्याने सुरू करण्यात आलेल्या गव्हाच्या पोळी उपक्रमाची नारेगाव येथील अन्नामृत फाऊंडेशनच्या स्वयंपाकघराला भेट देत शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि.७) या उपक्रमाची पाहणी केली.
सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाचा टप्प्याटप्प्याने शहरातील महापालिका, अनुदानित आणि काही जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ३६ हजार विद्यार्थ्यांपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन असून, सध्या ६ ते ८ हजार विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा पोळीचे वितरण केले जात आहे.
भात, खिचडी, उसळ आणि आमटीसोबतच आता शालेय पोषण आहारात गव्हाच्या पोळीचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण राज्यमंत्री भोयर यांनी शुक्रवारी (दि.७) अन्नमृत्तच्या नारेगाव येथील स्वयंपाकघरातील पोषण आहार तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करून फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम., मनपाचे उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण उपसंचालक कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व अन्नामृत फाऊंडेशनचे व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे उपस्थित होते.
यावेळी स्वयंपाकघरात डॉ. भोयर यांनी टोफू पनीर कापण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी मनपाच्या नारेगाव शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजन करून फुटाणे, टोफू पनीर आणि पोळीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, अन्नामृत फाऊंडेशनला सीएसआरअंतर्गत एका कंपनीने पोळी तयार करण्यासाठी यंत्र उपलब्ध करून दिले असून, दुसऱ्या कंपनीने सहा महिन्यांसाठी पुरेल इतका गहू दिला आहे. त्याआधारे दररोज ६ ते ८ हजार पोळ्या तयार करून विद्यार्थ्यांना वितरित केल्या जात असून, लवकरच या उपक्रमाचा शहरातील सर्व पात्र शाळांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय मेनूमध्ये पोळी आणण्याची तयारी
उत्तरेकडील राज्यांमध्ये शालेय पोषण आहारात पोळी दिली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मेनूमध्ये गव्हाची पोळी तसेच गोड आणि तिखट दलियाचा समावेश करावा, अशी मागणी यावेळी राज्यमंत्री भोयर यांच्याकडे करण्यात आली. या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले-