राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : श्री संस्थान गणपती मंदिर येथे बुधवारी (दि.२७) सकाळी स्वागत सभारंभात चिमटे आणि कोपरखळ्यांचा खेळ पाहायला मिळाला. उपस्थित राजकीय नेतेमंडळीनी एकमेकांना लक्ष्य केले. यात सर्वाधिक शाब्दिक बाण उबाठाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावरच सुटले. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूतीची कुजबूज सुरू होती.
शहराचे आराध्यदैवत असलेल्या राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खा. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, खा. कल्याण काळे, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विश्वस्त प्रफुल मालानी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गतवर्षी सूत्रसंचालन करताना माजी महापौर घोडेले यांनी माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव आधी घेतल्याने खा. संदीपान भुमरे चांगलेच संतापले होते. यावरून दोन्ही आजी-माजी खासदारांमध्ये व्यासपीठावरच हमरीतुमरी झाली होती. यावेळी उत्साह, खेळीमेळी आणि पक्षविरहित वातावरण होते. मात्र त्यातही मंत्री, नेतेमंडळींनी एकमेकांना शाब्दिक चिमटे घेण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे श्री संस्थान गणपती समोरच नेत्यांमध्ये कोपरखळ्यांचा खेळ रंगल्याने उपस्थित गणेशभक्तांमध्येही हशा पिकला होता.
● खा. भुमरे यांनी संस्थान मंदिरासाठी खासदार निधीतून ५० लाख देण्याची घो-षणा केली. ती घोषणा करताना त्यांनी मुद्दामहून चंद्रकांत खैरे यांचे नाव घेत सांगितले.
चंद्रकांत खैरे यांनी भाषणात पालकमंत्री संजय शिरसाट आणि खा. भुमरे यांना उद्देशून माझे जुने सहकारी आताचे नाही, जुने सहकारी असा चिमटा काढला.
खा. कराड यांनी खैरेंना माजी खासदार म्हणून संबोधित केले. आता माजी आहे तर माजीच म्हणणार ना, असा जोरही त्यांनी लावला. तर तुम्ही सर्व माझ्या ट्रेनिंगमध्ये तयार झाले, मला मार्गदर्शक म्हणा," मंत्री सावे यांनी खैरे यांचा माजी खासदार-माजी खासदार असा दोनदा उल्लेख केला. तत्पूर्वी त्यांनी पालकमंत्री शिरसाट यांनाही माझे काका, असे संबोधून चिमटा काढला. शिरसाट हे माझ्या वडिलांबरोबर फिरलेत. त्यामुळे त्यांना काकाच म्हणणार ना, असेही सावे म्हणाले.
66 पालकमंत्री शिरसाट यांनी भाषणात खैरेंचा आमचे मार्गदर्शक, असा उल्लेख केला. त्यामुळे खैरे आनंदले. शिरसाट बोलत असतानाच विरोधी पक्षनेता दानवे यांचे आगमन झाले. तेव्हा खैरे यांचे आवडते विरोधी पक्षनेते आले, असा चिमटाही काढला.