Sambhajinagar News : संभाजीनगरात दीपकेंच्या घरी जल्लोष file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : संभाजीनगरात दीपकेंच्या घरी जल्लोष

फटाके फोडून आनंदोत्सव; आई-वडील भावुक, अनेक रात्री झोप नाही, आज डोळ्यांत आनंदाश्रू

पुढारी वृत्तसेवा

Celebrations at Deepak's home in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आई-वडील म्हणून आम्हाला अभिजीतची सतत काळजी होती. त्याला प्रचंड विरोध झाला. मात्र, माझ्या मुलाने मोठे काम करून दाखवले. हा त्याचा एकट्याचा विजय नाही तर सर्व विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आहे. आज आमच्या डोळ्यातील अश्रू हे काळजीचे नाहीत. तर हे आनंदाश्रू असल्याची भावनिक प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी दिली.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज येथील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला, तर परिसरात मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अभिजीत दीपके यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपके यांच्या आई अनिता दीपके म्हणाल्या, आज मला खूप आनंद झाला आहे. या आंदोलनात अभिजीतला चापट खावी लागली. त्याच्यावर शाई फेकण्यात आली, नको तिथे त्याला झोपावे लागले. हे पाहून आमच्या डोळ्यात अश्रू येत होते. मात्र आज त्याचा खूप मोठा विजय झाला आहे. त्याला टायफॉईड झाला तरी तो मागे हटला नाही. या सर्वातून त्याने हा विजय मिळवला आहे. तो घरी आला की त्याला मिठी मारून त्याला ओवाळणार आहे. डोळ्यांतील अश्रू हे काळजीचे नाही तर आनंदाचे असल्याचे त्यांची आई यांनी सांगितले.

तर अभिजीत यांचे वडील म्हणाले, तो दिल्लीत गेला तेव्हा आम्हाला त्याची खूप काळजी वाटत होती. रात्री ३, ४ वाजेपर्यंत आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मात्र तो त्याच्या उद्देशावर ठाम होता. ६ जूनपासून तो बोस्टनहून भारतात आला तेव्हापासून त्याला झोप नाही. त्याला सतत त्याचे ध्येय दिसत होते. विद्यार्थ्यांच्या अडचणी दिसत होत्या.

मात्र आज त्याच्या मनावरील ओझे कमी झाले आहे त्याच्या कष्टाचे चीज झाले. आम्हालाही याचा खूप मोठा आनंद झाला आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा हा विजय झाला असल्याचे दीपके यांचे वडील म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा जल्लोष

नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला शनिवारी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर शहरातील क्रांती चौकात विद्यार्थी कृती समिती, विद्यार्थी महाविकास आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, नागरी मूलभूत हक्क अभियान आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रारंभी नीट पेपर फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या २२ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजीद्वारे आनंदोत्सव साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT