Sambhajinagar News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

यापूर्वी दोन गुन्हे दाखल, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Case registered against person for stalking a minor girl

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीशी संबंधित दोन गुन्हे दाखल असतानाही तिचा पुन्हा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप कनकोरी येथील संदेश बाबासाहेब पवार याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात ये-जा करताना पाठलाग होत असल्याची तक्रार संबंधित १७वर्षीय विद्यार्थिनीने वडिलांसह पोलिसांकडे केली.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थिनी एका महाविद्यालयात बारावीत शिक्षण घेत आहे. बुधवारी (दि. २१) ती बसने महाविद्यालयात येत असताना शिवाजी चौक परिसरात संदेश पवार मोटारसायकलवर थांबलेला दिसला. तो पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने तिने शिवाजी चौकात न उतरता आंबेडकर चौकात उतरून महाविद्यालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

काही अंतर पुढे गेल्यानंतर पवार मोटारसायकलवरून तिच्याजवळ आला. आपल्याला आवडत असल्याचे सांगून त्याने बोलण्याचा आग्रह केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विद्यार्थिनी महाविद्यालयात पोहोचल्यानंतरही तो प्रवेशद्वाराजवळ थांबलेला दिसल्याचे तिने सांगितले.

दुपारी महाविद्यालयातून बाहेर पडताना पुन्हा पाठलाग होण्याची भीती वाटल्याने तिने मागील प्रवेशद्वारातून बाहेर पडून बसस्थानक गाठले. मात्र, तेथेही पवार मोटारसायकलवर थांबलेला दिसल्याने तिने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर वडिलांसोबत पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. आधीच्या दोन गुन्ह्यांचीही नोंद तक्रारीनुसार, संदेश पवार याच्याविरुद्ध २०२३ आणि २०२५ मध्ये शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित दोन गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणांमध्ये पोक्सो कायद्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तो १५ दिवस न्यायालयीन कोठडीत होता, अशी माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे. आता पुन्हा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप झाल्याने गंगापूर पोलिसांत तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT