Case immediately registered at Chhavani against unauthorized plotting in Padegaon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली असली, तरी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत पोलिस ठाण्यानुसार वेगवेगळे चित्र समोर येत आहे. पडेगावातील प्रकरणात तक्रारीच्या अवघ्या एका दिवसात गुन्हा दाखल झाला. तर देवळाईतील गट क्रमांक ५३ ते ६० मधील अनधिकृत प्लॉटिंगप्रकरणी मनपाने तीन दिवसांपूर्वी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. तांत्रिक पुरावे प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
देवळाईतील अनधिकृत प्लॉटिंगप्रकरणी महापालिकेला १० ऑगस्ट रोजी तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यासह जमीनधारकांकडून मालकी हक्काची कागदपत्रे आणि लेआउट मंजुरीची माहिती घेण्यात आली. तसेच कागदपत्रांच्या तपासणीत सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आणि आवश्यक लेआउट मंजुरी न घेता भूखंड विकसित केल्याचे निदर्शनास आल्याचे मनपाने तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी मनपाचे इमारत निरीक्षक कुणाल भोसले यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ अंतर्गत चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत गट क्रमांक ५७ मधील शेख अमीर शेख हबीब व जाबेर खान रशीद खान, गट क्रमांक ६० मधील शेख मोईन शेख रहमेतुल्ला पटेल, गट क्रमांक ५३ मधील शेख रशीद शेख हैदर, इस्लाम हुसेन शेख व उमेर शफीक शेख यांची नावे आहेत.
गट क्रमांक ५९ संदर्भात मोहम्मद जाहेर खान नसीर मोहम्मद खान, तसेच मालमत्ताधारक मोहम्मद निजामुद्दीन मोहम्मद मोईनोद्दीन व मोहम्मद ताजुद्दीन मोहम्मद मोईनोद्दीन यांची नावेही तक्रारीत नमूद आहेत. गट क्रमांक ५४, ५५, ५६ आणि ५८ मधील संबंधितांची नावे पुरवणी तक्रारीत जोडली जाणार आहेत. मात्र पडेगावातील समान स्वरूपाच्या प्रकरणात तक्रारीनंतर एका दिवसात गुन्हा दाखल झाल्याचे मनपा वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
तर देवळाईत मनपाने प्रत्यक्ष पाहणी, सातबारा व उपलब्ध कागदपत्रांची तपासणी करून मंजूर लेआउट नसल्याचे तक्रारीत नमूद केले असतानाही गुन्ह्यास विलंब का, असा सवाल उपस्थित होत आहे. एकाच स्वरूपाच्या अनधिकृत प्लॉटिंगप्रकरणी शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगळी का, याची चर्चा आता मनपा वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिकेकडून पोलिसांकडे आवश्यक पाठपुरावा सुरू आहे. अधिकारी तीन दिवसांपासून पोलिस ठाण्यात जात आहेत. मनपाकडून कायदेशीर तक्रार देण्यात आली आहे. अशी माहिती सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.