Case filed against four female employees of Vidyadeep Children's Home
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छावणी भागातील विद्यादीप बालगृहातून पळून न्यायालयाकडे धाव घेणाऱ्या त्या नऊ मुलींच्या छळाची आपबिती पोलिस चौकशीत खरी असल्याचे समोर आले आहे. तीन महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर छावणी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.९) चार महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध एका मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिघींना अटकही केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढारीशी बोलताना दिली.
नर्स चिता भास्कर गायकवाड (५६), केअर टेकर अलका फकीर साळुंके (४६), सहायक अधीक्षिका अन्वेली भगवान जोसेफ (३१) आणि कमल डेव्हिड गिन्हे (४८) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, बालकल्याण समितीच्या आदेशाने ती ९ जानेवारी २०२४ पासून विद्यादीपमध्ये राहते.
तिला तुझे शिक्षण आम्ही करू, असे सांगण्यात आले होते. मात्र अलका मावशी, हेड सिस्टर कमल यांनी तिचे शिक्षण सुरू करा, असे वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. बालकल्याण समिती बालगृहात यायची तेव्हा मुलींना वरच्या खोलीत कुलूप लावून कोंडून ठेवायचे. मागणी केल्यानंतरही समितीकडे घेऊन जात नसल्याने मुलींना अडचणी सांगता येत नव्हत्या.
स्टोअर रूममध्ये भरपूर सामान यायचे. परंतु हेड आधी कमल आता वेल्लरी आहे. दोघींही दैनंदिन वापरण्याचे साहित्य थोडेच देऊन एवढेच वापरा, असे म्हणायच्या. यासह अन्य छळाचे प्रकार तिने तक्रारीत नमूद केले आहेत. दरम्यान, २९ जूनला फिर्यादीसह अन्य चौघीजणी उसवलेले कपडे शिवत बसलेल्या होत्या.
सॅनिटरी पॅडही दिवसातून एक किंवा दोनच मोजून देत होते. त्यामुळे मुलींचे कपडे खराब व्हायचे.
जेवण कमी देत होते म्हणून भूक लागली तर मुली गुपचूप किचनमध्ये जाऊन जेवण घेऊन यायच्या. त्याचा व्हिडिओ सिस्टर काढत होत्या. समितीला दाखवू, अशी धमकी देत असल्याने मुली घाबरून राहत होत्या.
विद्यादीपचे कर्मचारी वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे, मात्र मुलींना वेगळे बनविलेले जेवण दिले जायचे.
फिल्टर बंद पडलेले असल्याने मुलींना बाथरूम किंवा पाण्याच्या टाकीतले पाणी पिण्यासाठी घ्यावे लागायचे.
मुलींना पोट दुखले तर दवाखाण्यात न नेता एकच गोळी दिली जायची.
दिवसात चार वेळा एका धर्माची प्रार्थना करायला लावली जायची. ज्या मुलींना प्रार्थना येत नव्हती त्यांना गुडघ्यावर बसविले जायचे.
मैत्रिणी चांगल्या राहत असल्याचे पाहून सिस्टर त्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत काय, असे म्हणत हिणवायच्या.
दोन्ही रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्याची रेकॉर्डिंग ऑफिसच्या स्क्रीनवर दिसायची. रूम राहण्याची आणि कपडे बदलण्याची जागा होती. खाली गेल्यानंतर स्क्रीनवर इतर मुलींच्या सीसीटीव्हीच्या हालचाली दिसत होत्या. त्या पाहून लाजिरवाणे वाटायचे.