Case filed against five people for inciting them to end their lives
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी परिसरात श्रीकांत ऊर्फ शक्ती गोरख शिंदे या २२ वर्षीय तरुणाने सुसाईडनोट लिहून घरात ९ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध हसूल पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलदीप ऊर्फ तेजस बळीराम निकम (२९, रा. मिटमिटा पडेगाव), सुमेबोध ऊर्फ सुमित कुंडलिक पडघान (३८, रा. पिशोर, ता. कन्नड), गुरुदत्त रासणे (रा. पिशोर, ता. कन्नड) आणि हास्ता, कन्नड येथील एकाच कुटुंबातील दोन तरुणींचा (बहिणी) आरोपींमध्ये समावेश आहे.
मृत श्रीकांत शिंदे हा मूळचा पिशोर (ता. कन्नड) येथील रहिवासी असून, तो मागील दोन वर्षांपासून जाधववाडी येथील मंदा डोंगरे यांच्या घरात भाड्याने राहत होता. तो शहरात सायबर सुरक्षा विषयाचे क्लासेस करत होता.
९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास श्रीकांतने आपल्या खोलीत दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. गंभीर अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र १० डिसेंबर रोजी मध्यरात्री १:१५ वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. श्रीकांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता, तेथे सुसाईडनोट आढळून आली.
या चिठ्ठीत त्याने आपल्या मृत्यूला दोन तरुणी त्यातील एकीचा प्रियकर तेजस, गुरुदत्त रासणे आणि सुमित सर हे जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. आरोपींनी श्रीकांतला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. श्रीकांतचे वडील गोरख संगराव शिंदे (६०, रा. पिशोर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्मूल पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे करत आहेत.