Cannabis cultivation in a cotton field
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: सोयगाव तालुक्यातील वरखेडी बुद्रुक शिवारातील कपाशीच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी फर्दापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत ७५ वर्षीय शेतकऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईत गांजाची सात झाडे मुळांसह जप्त करण्यात आली असून, एकूण १६.२४ किलो वजनाचा ओला गांजा हस्तगत करण्यात आला. जप्त गांजाची अंदाजे किंमत ८ लाख १२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुन्नीलाल गोबरू चव्हाण (वय ७५, रा. वरखेडी बु., ता. सोयगाव) यांच्या ताब्यातील गट क्रमांक ४५ मधील कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती फर्दापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतात कारवाई केली. यावेळी गांजाची सात झाडे मुळांसह, फांद्या व फुलोऱ्यासह आढळून आली.
पोलिसांनी ही झाडे मुळांसह उपटून त्यांचे वजन केले असता १६.२४० किलो गांजा आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे ८ लाख १२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरील गांजाच्या झाडांच्या मुळाशी असलेली ओलसर मातीही तपासणीसाठी नमुना म्हणून जप्त करून सीलबंद करण्यात आली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अंमलदार विठ्ठल बबनराव डोके (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून चुन्नीलाल चव्हाण यांच्याविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फर्दापूर पोलिस ठाण्याचे सापोनि सुधीर मोटे पोउनी चंद्रशेखर पाटील पो.ना निलेश लोखंडे पो. कॉ जगदीश सोनवणे, संतोष उबाळे यांचे पथक करीत आहे.