

Blinkit's food license suspended by FDA
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज येथील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि. (ब्लिंकइट) या ऑनलाइन डिलिव्हरी पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत पेढीच्या गोदाम व कोल्ड रूममध्ये अस्वच्छता, बुरशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. यासंदर्भात त्रुटींची पूर्तता करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पेढीकडून खुलासा सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' या विशेष मोहिमेंतर्गत अन्नपदार्थांमधील भेसळ व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी एफडीएकडून तपासणी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी १३ ऑगस्ट रोजी ब्लिंकइटच्या वाळूज येथील पेढीची तपासणी केली. त्यावेळी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विविध त्रुटी आढळल्या.
त्यांची पूर्तता करण्यासाठी सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पेढीने नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच १० सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीसही पेढीचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सहायक आयुक्त द. वि. पाटील यांनी पेढीचा अन्न परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
तपासणीत आढळलेल्या त्रुटी
अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य व रसायने ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. गोदाम व कोल्ड रूममध्ये अस्वच्छता, बुरशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. खाद्यपदार्थ जमिनीवर तसेच भिंतीलगत अस्ताव्यस्त ठेवण्यात आले होते. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी नव्हत्या. तसेच कर्मचारी अॅप्रन, हातमोजे व शिरोवस्त्र (हेड गियर) वापरत नसल्याचे आढळले. पेढीत पुरेशी प्रकाशयोजना नव्हती. कचरा विल्हेवाटीची योग्य व्यवस्था तसेच ग्राहक तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणाही उपलब्ध नव्हती.
कडक कारवाईचा इशारा
निलंबनाच्या कालावधीत पेढीने कोणत्याही अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला. पेढीवर प्रशासनाकडून पाळत ठेवण्यात येणार आहे.