Called the District Magistrate and stopped the marriage of a 16-year-old girl
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीचा २५ वर्षीय मुलासोबत विवाह होणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांना लग्नपत्रिका व फो-नद्वारे माहिती दिली. त्यांनी जिल्हा महिला बाल विकास समिती अधिकारी आणि दामिनी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. रविवारी (दि.२) सकाळी १० वाजता पथकाने धाव घेत अक्षदा पडण्यापूर्वीच विवाह रोखला. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि वडील दारूच्या आहारी गेल्याने नातेवाईकांनी मुलीचा विवाह लावून देण्याची तयारी केली असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हमालवाडा येथे मोठ्या थाटामाटात लग्नाची तयारी करण्यात आली होती. रस्त्यालगत मंडप, सजावट आणि स्टेज उभारण्यात आले होते. दामिनी पथकाने परिसरात साध्या वेशात गस्त घालून माहिती गोळा केली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले की, लग्न दुपारी १२.३० वाजता होणार आहे. यानंतर पथकाने लग्नमंडपात अचानक धाड टाकली. तेथे नवरीसह उपस्थित मंडळींची चौकशी केली.
महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी व दामिनी पथकाने दस्तऐवज तपासले असता, मुलीचे वय १६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले, तर नवरदेवाचे वय २५ वर्षे होते. नगर येथून व-हाडी मंडळी दाखल झाले होते. जेवणाची तयारी सुरु होती. मंडपात हळद झालेली होती. दोन तासांत अक्षदा पडणारच होत्या. शिकण्याच्या वयात संसाराची दोरी हाती देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला.
वडील दारूच्या आहारी, घरची परिस्थिती बेताची
नवरी ही शहागडजवळील एका कारखान्याजवळ राहणारी असून, सध्या १२ वी मध्ये शिकते. तिच्या आईचे माहेर हमालवाडा येथे आहे. मुलीचे वडील दारूच्या आहारी गेले असल्याने कुटुंबीयांनी लवकर लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. काका, मावशी, मामा यांनी जेवण, भांडी, मंडप असा सर्व खर्च उचलला होता. नवरदेव शिर्डी परिसरातील असून, तो चहा टपरी चालवतो. मुलीची दामिनी पथकाने विचारपूस करताच ती ढसाढसा रडू लागली. मला शिकायचे होते पण घरच्या परिस्थतीमुळे लग्नास तयार झाल्याचे सांगून भावनांना वाट मोकळी करून दिली.
मोठ्या थाटात सुरू होती लग्नाची तयारी
नवरीचा मेकअप सुरु असतानाच पथक धडकले. दामिनी पथकातील हेड कॉन्स्टेबल अनिता शिंदे, निर्मला निंभोरे, पुजा जाधव, आनंद वाघ, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विघ्ने, आम्रपाली बोर्डे, नितेश, सातारा ठाण्याचे एएसआय पांडे, अंमलदार सुनिता हाके, गिता ढाकणे यांनी विवाह रोखला. नातेवाईकांना बालविवाह कायद्याची माहिती देऊन समज दिली. मात्र, नवरदेवाला नातेवाईकांनी तेथून काढून दिले होते.