Businessman kidnapped for Rs. 5.5 lakh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील वाहन खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास साडेपाच लाख रुपये देऊनही ठरल्याप्रमाणे त्यांने तीन टिप्पर दिले नसल्याने तो शहरात येताच त्याचे व त्याच्या मित्राचे अपहरण केले. दरम्यान याबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून दिले. ही घटना १० जुलै रोजी धुळे- सोलापूर रोडवर घडली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अपहरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन ते चार महिन्यांपूर्वी शरद शिवकांत पाटील (४५, रा. लातूर) उमाकांत राजकुमार (३५, रा. लातूर) व त्यांचे साथीदाराने नाशिक येथील आसीफ खान याच्याकडे जुने तीन टिप्पर घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये दिले. चार महिने झाले तरी तो पैसेही परत करेना आणि ठरल्या प्रमाणे टिप्परही देईना, म्हणून या दोघांत अनेकदा शाब्दिक चकमकही उडाली होती. दरम्यान १० जुलै रोजी आसीफ खान मित्रासह धुळे सोलापूर हायवेवर एका हॉटेल समोर वाहन खरेदीसाठी आला होते. ही संधी साधत शरद पाटील याने साथीदारांसह आसीफ खान व त्याच्या मित्राला गाडीत कोंबून थेट उदगीर गाठले.
अपहरणकर्त्यांनी आसिफ खान यांचे मित्र शेख रईस मोहम्मद हानिफ (३२, रा. बीड बायपास) यांना रात्री १०.३० वाजता फोन करून तुझ्या मित्रांचे अपहरण केले असून, त्याला सोडवण्यासाठी साडेपाच लाख रुपये लातूरला घेऊन ये, अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली. या धमकीनंतर शेख रईस व आसिफच्या मुलाने सातारा पोलिस ठाणे गाठले.
या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक पथक उदगीरकडे रवाना केले. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच व्यापारी व त्याचा मित्राची पाटील यांनी सुटका केली. पोलिस पथक अंबाजोगाईत असतानाच आसिफ यांची सुटका झाली होती. तेथेच आसिफ व त्यांच्या मित्राचा जवाब नोंदवून हे पथक उदगीरकडे तपासासाठी रवाना झाले आहे.