Businessman in Bajajnagar cheated of Rs. 53 lakh 81 thousand
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वॉटर ऑफिसचा अधिकारी असल्याची थाप मारून एकाने ८१ वर्षीय उद्योजकाच्या मोबाईलवर वॉटर बिल अपडेट एपीके ही फाईल पाठवून त्यांचा मोबाईल हॅक केला. तसेच त्यांच्या मोबाईलमधील बँकेच्या अॅपचा वापर करून ५३ लाख ८१ हजारांची रक्कम दुसऱ्या खात्यावर वळविल्याची घटना १६ ऑगस्ट उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवानदास रामजीदास अहुजा (८१ रा. आरएल -४२ बजाजनगर) यांची वाळूज एमआयडीसीतील ई-६० सेक्टरमध्ये मारुती इंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे. १४ ऑगस्ट रोजी भगवानदास अहुजा हे घरी असताना त्यांना डीपीवर एमआयडीसीचा लोगो असलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून वॉटर बिल अपडेट एपीके ही फाईल पाठविण्यात आली.
तसेच सदरचे अॅप आजच्या आज अपडेट करा नाहीतर तुमच्या कंपनीचे वॉटर कनेक्शन आज कायमस्वरूपी कट होणार व ते परत जोडले जाणार नाही असा मॅसेज देखील आला. सदरचा मॅसेज वाचत असताना त्यांना एक व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने वॉटर ऑफिसमधून दिव्येश जोशी बोलत असून तुम्ही वॉटर बिल अपडेट एपीके अॅप फोनमध्ये डाउनलोड करा व आजच्या आज नेट बँकिंगद्वारे पेमेंट भरा असे सांगितले. अहुजा यांनी मी नेट बँकिंग वापरत नाही तेव्हा त्याने तुम्हाला नेट बँकिंगवरूनच पेमेंट करावे लागेल असे सांगितले. वयोवृद्ध आहुजा यांनी यावर विश्वास ठेवून ते बँकेत गेले व त्यांनी त्यांच्या दोन्ही खात्यावर नेट बँकिंगची सुविधा चालू करून घेतली.
बँकेतून बाहेर पडणार तोच त्या व्यक्तीने पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून केला. व पेमेंट लवकर भरा असे म्हणाल्याने अहुजा यांनी त्यास बँकेत बसून एपीके फाईलमधील फार्म भरतो तेव्हा त्याने फॉर्म खूप मोठा आहे तुम्ही घरी जाऊन भरा असे सांगिलते. अहुजा हे घरी जाऊन फॉर्म भरत असताना दिव्येश नावाच्या व्यक्तीचा पुन्हा त्यांना फोन आला. यावेळी अहुजा यांनी त्याला नेट बँकिंगवरून मला पेमेंट करता येत नाही. त्यावर समोरच्या त्या व्यक्तीने अहुजा यांना तुम्हाला बँकेने दिलेला नेट बँकिंग नंबर मला पाठवा मी तुमचे पेमेंट करून टाकतो असे सांगितले होते.
भगवानदास अहुजा यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या दोन्ही खात्यावरून जवळपास २० वेळा ट्राजेंक्शन होऊन या खात्यावरील रकमेसह ८ एफडी ज्या अजून मॅच्युअर झाल्या नाहीत. त्या सुद्धा तोडून असे एकूण ५३ लाख ८१ हजार ४ रुपये बंधन बँक तसेच मर्चेंट बँके खातेदाराच्या खात्यावर वळविण्यात आले असल्याचे अहुजा यांना सांगण्यात आले. दिव्येश जोशी नामक व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात यातच अहुजा यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे हे करीत आहेत.
अहुजा यांनी दिव्येश नावाच्या व्यक्तीला त्यांच्या बँक खात्याचा नेट बँकिंग नंबर देताच त्यांच्या मोबाईलवर येणारे मॅसेज तसेच ई-मेल येणे बंद झाल्याचे अहुजा यांच्या लक्षात आले. याविषयी विचारणा करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीस फोन केला. फॉर्म खूप मोठा आहे शिवाय नेटवर्क पण खूप स्लो असल्याचे सांगून अपडेट करून तुम्हाला कॉल करतो असे सांगून त्याने फोन बंद केला. त्या दिवशी दिवसभर त्याने अहुजा यांना फोन केला नाही. १५ व १६ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अहुजा यांना त्याने व्हॉट्सअॅप कॉल करून फार्म खूप मोठा आहे, नेटवर्क पण स्लो असून वॉटर बिल अपडेट झाले की मी तुम्हाला कॉल करतो असे तेच पुन्हा सांगितले. नेट बँकिंग नंबर दिल्यापासून मोबाईलवर येणारे मॅसेज व ई-मेल बंद झाले होते.
त्यानंतर त्यांचा मोबाईल पूर्णपणे बंद झाल्याचे लक्षात येताच अहुजा यांनी पुण्यात राहणारा त्यांचा मुलगा सौरभ अहुजा व मुलगी शिल्पा यांना फोन करून याविषयी कळविले. फसवणुकीचा प्रकार असावा असा संशय आल्याने त्यांनी वडिलांना तत्काळ बँकेत जाऊन माहिती घेण्यास सांगितली.