Burglary in Ulkanagari sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पती-पत्नी नोकरीनिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅटचा कोयंडा कट करून तब्बल सव्वा पंचवीस तोळे (२५२.५ ग्रॅम) सोन्याचे दागिने व बिस्किटे, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना उल्कानगरीतील अमृतसिद्धी अपार्टमेंटमध्ये बुधवारी (दि. २५) दुपारी १२ ते सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विशाल सोन्नेकर (४२) यांच्या तक्रारीनुसार, ते एका बँकेत कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी या शाळेवर कंत्राटी शिक्षिका आहेत. बुधवारी सकाळी नऊ वाजता विशाल बँकेत गेले, तर दुपारी १२ वाजता पत्नी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून शाळेत गेल्या होत्या. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास समोर राहणाऱ्या शेजारच्या महिलेने विशाल यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा दिसत असून चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला.
विशाल यांनी तात्काळ भाऊ व पत्नी यांना कळवून घरी धाव घेतली. घरी पाहणी केली असता चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कॉयडा कट करून चोरी केल्याचे दिसून आले. बेडरूमच्या दरवाजाचा लॅच उचकटून कपाटाचे लॉक तोडत आतील तीन सोन्याची मंगळसूत्रे (८७ ग्रॅम), मोहनमाळ (४५ ग्रॅम), बांगड्या (३२.५ ग्रॅम), चार अंगठ्या (२७ ग्रॅम), कानातले (१५ ग्रॅम), नेकलेस (१५ ग्रॅम), लॉकेट (१५ ग्रॅम), बाळी (१ ग्रॅम) आणि दोन सोन्याची बिस्किटे (१५ ग्रॅम) असे एकूण सव्वा पंचवीस तोळे सोने,
५० ग्रॅम चांदीच्या वस्तू व ८ हजार रुपये रोकड असा १२ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपीच्या शोधासाठी पथक तैना केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शो घेतला जात आहे.
चौकटीवर सात घाव चोरट्यांनी 'चार्जिंग कटर'च्या सहाय्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. बेडरूमचा लॅच लॉक उचकटण्यासाठी लोखंडी पहारीने चौकटीवर सात घाव घालून दरवाजा तोडला आणि स्लायडिंग कपाटातील लॉकर फोडून सर्व साहित्य बेडवर अस्ताव्यस्त फेकत दागिने लंपास केले.