छत्रपती संभाजीनगर : शहरातील तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या ड्रग्ज माफियांविरुद्ध पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या झिरो टॉलरन्स पॅटर्नमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्हेगारांना शहर पोलिस आता बुलडोजर पॅटर्नने दणका देण्याच्या तयारीत आहेत.
जिन्सीत अंमली पदार्थांचे सामाज्य निर्माण करणारा कुख्यात अश्पाक पटेलच्या सिंडिकेटमधील 17 आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या बेकायदा मालमत्ता आणि घरांवर बुलडोजर चालविण्याची तयारी गुन्हे शाखेने केली आहे. यासंदर्भात पोलिस लवकरच महापालिकेकडे आरोपींच्या नावांसह त्यांचे रहिवासी पत्ते आदींची माहिती असलेला सविस्तर प्रस्ताव पाठविणार आहेत. कायद्याचा दुहेरी दणका या ड्रग्ज तस्करांना बसणार आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने ड्रग्ज माफियांची मोठी सिंडिकेट उद्ध्वस्त केली. आता केवळ अटक करून न थांबता, ड्रग्ज तस्करांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुन्हे शाखेला कडक आदेश दिले आहेत.
याच मोहिमेअंतर्गत आता तस्करांच्या मालमत्तांची कुंडली काढली जात आहे. ज्या आरोपींनी ड्रग्ज विक्रीतून मिळवलेल्या काळ्या पैशातून बेकायदा किंवा अतिक्रमित जागेवर घरे बांधली आहेत, ती शोधून काढली जात आहेत.
ही बांधकामे महापालिकेच्या माध्यमातून जमीनदोस्त करून शहरात एक कठोर संदेश देण्याचा पोलिसांचा मानस आहे. अश्पाक पटेलच्या टोळीतील अनेक आरोपींच्या घरातूनच अंमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणांवर बुलडोझर फिरवून गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडण्यात येणार आहे. मोक्का आणि एमपीडीए सारख्या कारवायांसोबतच आता बुलडोझर ॲक्शनमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
सिंडिकेटमधील 17 आरोपी अटकेत
शेख कलीम शेख सरदार, अनिता अविनाश पाचुंदे, अविनाश शेषराव पाचुंदे, शेख मुस्ताक शेख इसाक, सय्यद रहीम सय्यद अन्वर, आबेदुल्ला अब्दुल्ला खान, शेख सोफियान शेख नजीर, अब्दुल्ला समी खान, अब्दुल नवीद खान अब्दुल समी खान, शेख नावेद शेख हमीद, शेख अय्याज ऊर्फ शेरू शेख सिराज, अनिल साळवे, सय्यद अहताब, शेख समीर शेख राजसाब, सोहेल शेख सत्तार ऊर्फ चाऊ, सय्यद शाहीद अली इबाहिम आणि इशरत अकीब शेख या 17 आरोपींना आतापर्यंत गुन्हे शाखेने अटक केलेली आहे.
फरार अश्पाकच्या नाड्या आवळणे सुरू
जिन्सी आणि सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचे जाळे पसरविणाऱ्या अश्पाक पटेलने अनेक पेडलर्सला हाताशी धरून नशेचा बाजार मांडला होता. मात्र गुन्हे शाखेने धडक कारवाई करत त्याच्या टोळीतील 17 जणांना जेरबंद केले. यामध्ये अश्पाकचा आर्थिक कारभार सांभाळणारी त्याची मैत्रीण इशरत शेख हिचाही समावेश आहे. इशरतच्या अटकेनंतर अश्पाकच्या सामाज्यातील अनेक गुपिते उघड झाली असून, आता त्याच्या मुसक्या आवळणे सुरू झाले आहे.