वडगाव येथील तलावात मृतदेह आढळल्याची वार्ता परिसरात पसरताच बघ्यांनी केलेली मोठी गदीं. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्याने जीवन संपवले

वडगाव तलाव व गादिया विहार परिसरातील घटना; साला-मेव्हण्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : वडगाव येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर साल्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ४) उघडकीस आली. एकाच कुटुंबातील दोघांचा वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सीतानगरात राहणारा सिद्धार्थ ऊर्फ पिंट्या शिवाजी जाधव याला भेटण्यासाठी त्याचा साला विनोद लक्ष्मण जाधव (२५, रा. साठेनगर, वाळूज) हा शुक्रवारी (दि. ३) आला होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून (एमएच २०, ईक्यू-५८२८) वडगाव येथील तलावाकडे गेले. तेथे सिद्धार्थ कपडे काढून पोहण्यासाठी तलावात उतरला; मात्र पाण्यातील खड्यांचा अंदाज न आल्याने तो बुडाला.

रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने शनिवारी सकाळी घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी वडगाव तलावाच्या काठी सिद्धार्थचे कपडे, चपला, मोबाईल आणि दुचाकी आढळून आली. साला-मेव्हणे दोघेही पाण्यात बुडाल्याच्या संशयावरून पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एमआयडीसी बाळूज व मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबवून सिद्धार्थचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर जवानांनी तलावात सुमारे साडेतीन तास विनोदचाही शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.

विनोदने रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले

एकीकडे अग्निशमन दलाचे जवान तलावात विनोदचा शोध घेत असतानाच, दुसरीकडे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विनोदने गादिया विहारसमोरील रेल्वे रुळावर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. शुक्रवारी सोबत असलेल्या साला आणि मेव्हण्याचा अशा वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. सिद्धार्थच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात, तर विनोद जाधवच्या मृत्यू प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकाने गळफास घेऊन जीवन संपवले

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात एका ४१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ४) दुपारी उघडकीस आली. दीपक शामराव म्हस्के (४१, रा. सिडको गार्डनजवळ, वाळूज महानगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक म्हस्के यांनी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच विष्णू शेरे आणि इतरांनी त्यांना बेशुद्धावस्थेत तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT