Boy drowns in lake while taking ox for a wash
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा बैल पोळ्यानिमित्त तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील पिरोळा शिवारात गुरुवारी (दि. १०) दुपारी घडली.
संदीप संजय गोरे (१५, रा. भराडी) असे मृताचे नाव असून तो सरस्वती भुवन महाविद्यालयात इयत्ता ८ वीत शिक्षण घेत होता. संदीपच्या वडिलांची पिरोळा शिवारात शेती आहे. बैल पोळा असल्याने संदीप त्याचा काका, चुलत भाऊ यांच्यासोबत बैल धुण्यासाठी गेला होता. तलावात बैल धुवत असताना तळ्यातील गाळात तो फसला व पाण्यात बुडाला. यात त्याचा मृत्यू झाला. काकाने ही माहिती देताच ग्रामस्थांनी धाव घेत शोध कार्य हाती घेतले. मात्र संदीपचा शोध लागला नाही. यामुळे प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर येथील एनडीएफच्या पथकाला पाचारण केले. पथकातील जवानांनी दुपारी ४ वाजता मृतदेह बाहेर काढला.
घटनास्थळी तहसीलदार सागर वाघमारे, मंडळ अधिकारी श्रीमती माने भेट देत विचारपूस केली. बीट जमादार यतीन कुलकर्णी, रामेश्वर जाधव शोध मोहिम दरम्यान घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास यतीन कुलकर्णी करीत आहे.
संदीप गोरे याच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ आहेत. बैल पोळ्यात आपला बैल सुंदर दिसावा म्हणून संदीपला बैलांना रंग लावून बैलांना सजवायचे होते. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. बैल पोळा साजरा करण्याआधीच काळाने घाला घातला. ऐन सणासुदीच्या दिवशीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव हळहळले.