Gangapur News : गंगापूर-खुलताबादच्या ग्रामीण आरोग्य सेवेला बूस्ट file photo
छत्रपती संभाजीनगर

Gangapur News : गंगापूर-खुलताबादच्या ग्रामीण आरोग्य सेवेला बूस्ट

जिल्ह्यात ३० डॉक्टरांची नियुक्ती; आ. बंब यांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

Boost to rural health services in Gangapur-Khulatabad

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण आणि औद्योगिक वसाहतीलगतच्या भागातील आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांअभावी होणारी सर्वसामान्य रुग्णांची परवड आता थांबणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी तब्बल ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत. आमदार प्रशांत बंब यांनी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश आले असून, गंगापूर व खुलताबाद तालुक्यांतील पाच महत्त्वाच्या गावांना नवीन डॉक्टर मिळाले आहेत.

गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यांतील ग्रामीण भागासह वाळूज, रांजणगाव शेणपुंजी आणि लासूर स्टेशन यांसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक व नागरी भागांत लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण होता. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता किंवा शहराकडे धाव घ्यावी लागत होती.

या गंभीर समस्येची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे लेखी निवेदन देऊन रिक्त पदे तातडीने भरण्याची आग्रही मागणी केली होती. यामध्ये केवळ डॉक्टरच नव्हे, तर आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, शिपाई आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासोबतच, तातडीची गरज लक्षात घेऊन कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही त्यांनी लावून धरला होता. शासनाने याची सकारात्मक दखल घेत ३० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्तीवर शिक्कामोर्तब केल्याने रुग्णांना फायदा होणार आहे.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे ही काळाची गरज आहे. रिक्त पदांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आज यश आले आहे. आमदार प्रशांत बंब यांनी नेहमीच आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. आता डॉक्टरांप्रमाणेच आरोग्यसेविका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची पदेही लवकर भरली जावीत, जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा हा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.
अतुल रासकर, सदस्य, रुग्ण कल्याण समिती, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर

या पाच केंद्रांवर नवे वैद्यकीय अधिकारी

शासनाच्या या निर्णयामुळे खुलताबाद तालुक्यातील गदाना, तर गंगापूर तालुक्यातील वाडगाव, लासूर स्टेशन, जिकठाण आणि भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. यामुळे या परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील रुग्णांना वेळेत आणि हक्काचे उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT