देखभाल दुरुस्ती अभावी बोलेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची झालेली दुरावस्था. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar dangerous school building : विद्यार्थ्यांच्या वाटेवर जीर्ण इमारतीचा धोका; ग्रामस्थांचे उपोषण

विद्यार्थ्यांना दररोज याच धोकादायक इमारतीजवळून ये-जा करावी लागत असल्याने जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील बोलेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली; मात्र, तिच्या समोरच जुनी जीर्ण इमारत अद्यापही उभी आहे. विद्यार्थ्यांना दररोज याच धोकादायक इमारतीजवळून ये-जा करावी लागत असल्याने जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे.

ही इमारत पाडण्याची मागणी गेल्या नऊ वर्षांपासून करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ भाऊसाहेब काळे यांनी मंगळवारपासून (दि. १५) जिल्हा परिषद मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बोलेगाव जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, सध्या ३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जुन्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यासही उदासीनता दाखवत असून, दरवर्षी विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे काळे यांनी सांगितले. या जीर्ण इमारतीबाबत शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि शिक्षण समितीने २९ जून २०१८ रोजी पहिले पत्र दिले होते. त्यानंतर १ जुलै २०१८ रोजी ग्रामपंचायतीने इमारत पाडण्याबाबत ठराव केला. मात्र, त्यानंतरही वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचे लक्ष वेधूनही इमारत पाडण्यात आलेली नाही.

नवीन इमारत उभी असताना विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारी जुनी इमारत हटविण्यास प्रशासनाकडून विलंब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. जीर्ण इमारत तत्काळ पाडण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते काळे यांनी दिला आहे. त्यांच्या उपोषणाला विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

नऊ वर्षांपासून इमारत पाडण्याची मागणी

  • २०१८ : शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकांचे पहिले पत्र

  • १ जुलै २०१८ : ग्रामपंचायतीचा इमारत पाडण्याचा ठराव

  • ३२ विद्यार्थी : सध्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण

  • ९ वर्षे : वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई नाही

  • १५ सप्टेंबरपासून : जिल्हा परिषद मुख्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण

  • मागणी : धोकादायक जीर्ण इमारत तत्काळ पाडावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT