Bogus and substandard road works in five-star Shendra MIDC
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीतील रस्त्यांची बोगस आणि निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची चक्क प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून पाठराखण सुरू असल्याचे दिसत आहे. या एमआयडीसीमधील जवळपास सर्वच रस्ते खराब आणि उखडले असताना केवळ एकाच ठेकेदाराला नोटीस बजावून अधिकाऱ्यांनी सोपस्कार पार पाडले आहे. तर दयनीय आणि गंभीर दुरवस्था झालेल्या दुसऱ्या रस्त्यांच्या ठेकेदारांवर काहीच कारवाई केलेली नाही. त्यांच्याकडे साफ कानाडोळा त्यामुळे उद्योगनगरीच्या औद्योगिक वसाहतीत कशी होतील दर्जेदार कामे ? असा संताप उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीत सध्या काम मिळवायचे... ते निकृष्ट करायचे आणि पितळ उघडे पडलेच तर प्रशासनाच्या आर्शीवादाने पुन्हा थातूर-मातूर पॅचवर्क करून कागदोपत्री ओके मिळवून विषय संपवायचा असले प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एमआयडीसीच्या प्रवेश मार्गाचेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार ऋषिकेश ग्रुपला प्रशासनाने नोटीस बजावली आहे. मात्र दुसरीकडे येथील रेडिको कंपनीसमोरील रस्त्यांची अत्यंत दयनीय दुरवस्था झालेली असताना त्याकडे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष सुरू आहे.
येथील डी ब्लॉकमधील या रस्त्याचे डांबरीकरण ५ कोटी, १३ लाख १६ हजार ०७ रुपयांच्या निधीतून मे. मापारी इन्फ्राप्रोजेक्ट यांनी केले आहे. सद्यस्थितीत हा संपूर्ण रस्ताच जमिनीत रुतल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दर्जाहीन कामांमध्ये येथील रस्त्यांचा अक्षरशः धुरळा झाला आहे. अशीच अवस्था एमआयडीसीमधील अनेक रस्त्यांची झालेली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्याच्या चाळणीमुळे खडी पसरल्याने एमआयडीसीची वाटच खडतर झाली आहे. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक उद्योजक, कामगार आणि एमआयडीसीत दररोज ये-जा करणाऱ्यांकडून तीव्र नार ाजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांची डेडलाईन, दोन महिने उलटूनही काम नाही
या औद्योगिक क्षेत्रातील प्रवेश मार्गाचे गतवर्षी डिसेंबरमध्ये तब्बल ८ कोटी, ६७ लाख ९४ हजार १८९ रुपयातून रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले. मात्र काही महिन्यांतच हा रस्ता उखडून गेल्याने ठेकेदाराला जुलै महिन्यात पहिली आणि ८ सप्टेंबरला दुसरी नोटीस बजावून दोन दिवसांत दुरुस्तीचे काम करण्याची ताकीद दिली गेली. मात्र, दोन महिने उलटूनही रस्त्याचे काम झालेले नाही. जबाबदार अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.
संपूर्ण रस्ता उखडला, तरी फक्त थिगळे मारण्याची नोटीस
एमआयडीसीमधील अनेक डांबरी रस्ते उखडून अक्षरशः चाळणी झाली असताना चक्क काही ठिकाणी तडे गेले त्याची दुरुस्ती (पॅचवर्क) करावी, अशा आशयाची नोटीस निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराला बजावली आहे.
चांगले रस्ते हे एमआयडीसीचे काम उद्योजकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा देणे हे एमआयडीसीचेच काम आहे. त्यामुळे इथल्या खराब रस्त्यांची त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून द्यावी. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक मंदावून औद्योगिक विकासाला खीळ बसते.-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ