Body of seven-year-old boy from the Nandar incident found
पाचोड, पुढारी वृत्तसेवा : पोटच्या दोन निष्पाप मुलांना चॉकलेट आणि वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून इलेक्ट्रिक स्कुटीवरून बाहेर नेले आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे सोमवारी (ता. १६) रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्हा हादरला आहे.
दरम्यान, कालव्यात फेकलेल्या दोन भावांपैकी सात वर्षीय आरुष परमेश्वर रोडगे याचा मृतदेह दोन दिवसांनंतर इंदेगाव-ब्रह्मगाव शिवारातील कालव्यात बुधवारी (दि. १८) सकाळी साडे अकरा वाजता आढळून आला असून, सहा वर्षीय कार्तिक परमेश्वर रोडगे याचा शोध अद्याप सुरू आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण नांदरसह परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांच्या घरी चूलही पेटली नसल्याचे दिसून आले.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदर येथील परमेश्वर दामोदर रोडगे (वय ४०) याने सोमवारी सायंकाळी आपल्या दोन मुलांना चॉकलेट व वडापाव खाऊ घालण्याचे तसेच बाहेर फिरायला नेण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दोन्ही मुलांना आपल्या दुचाकीवर बसवून तो जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ घेऊन गेला. तेथे त्याने दोन्ही चिमुकल्यांना कालव्याच्या पाण्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. यावेळी दोन्ही चिमुकले 'पप्पा, आम्ही मरू, असं करू नका ना! अशी आर्त विनवणी करीत होते. मात्र, त्यांच्या विनवणीनेही त्याचे मन पाझरले नाही.
पोलिसांची घटनास्थळी धाव; पिता ताब्यात
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित पिता परमेश्वर रोडगे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मुलांना कालव्यात फेकल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.