Gram Panchayat financial irregularities pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Gram Panchayat financial irregularities : बोडखा ग्रामपंचायतीची अभिलेख, कागदपत्रे ताब्यात

चौकशी करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे ग्रामस्थांची लेखी तक्रार,

पुढारी वृत्तसेवा

खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील बोडखा-गंधेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवत १५व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर, विविध कामांचा खर्च तसेच आरोग्यविषयक उपक्रमांवरील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती.

तक्रारीची दखल घेत मंगळवारी (दि. २५) पंचायत समिती खुलताबाद येथील विस्तार अधिकारी बागुल यांच्या देखरेखीखाली ग्रामपंचायतीतील संबंधित अभिलेख व कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. १५व्या वित्त आयोगातून प्राप्त निधी, त्यातून करण्यात आलेली कामे, मंजूर रक्कम आणि प्रत्यक्ष खर्च याची माहिती ग्रामसभेसमोर मांडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

मोबाईल खरेदीच्या नोंदीवरून प्रश्न

ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तीन आशा कार्यकर्तींना सुमारे ७० ते ७५ हजार रुपये किमतीचे मोबाईल देण्यात आल्याची नोंद असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. विविध कामे, साहित्य खरेदी, आरोग्यविषयक उपक्रम आणि इतर खर्चाच्या नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आरोप अद्याप चौकशीत सिद्ध झालेले नाहीत. संबंधित कागदपत्रांची तपासणी, प्रत्यक्ष कामांची पाहणी आणि आर्थिक नोंदींची पडताळणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत विस्तार अधिकारी बागुल यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. आर्थिक व्यवहारांशी संबंधित रजिस्टर, बिले, देयके व अन्य आवश्यक दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची नियमानुसार तपासणी करण्यात येणार आहे.

तपासणीत आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे विस्तार अधिकारी बागुल यांनी सांगितले. त्यामुळे चौकशीच्या निष्कर्षाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ग्रामविस्तार अधिकारी लोणकर, शिपाई कलीम शहा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अरफत शहा, चेअरमन काकासाहेब लोंढे, माजी उपसरपंच सलीम पटेल, सुनील शिंदे, जनार्दन लोंढे, रत्तन बनसोड आदी उपस्थित होते.

आरोपांची चौकशी होणे बाकी

ग्रामस्थांनी केलेले आरोप हे तक्रारीच्या स्वरूपातील असून, त्यांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या अभिलेखांची तपासणी झाल्यानंतरच आर्थिक व्यवहारांमध्ये नियमबाह्य बाबी झाल्या आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT