भाजपने आमच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची हिंमत दाखवू नये : खा. काळे file photo
छत्रपती संभाजीनगर

भाजपने आमच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची हिंमत दाखवू नये : खा. काळे

टिपू सुलतान वक्तव्यावरून राजकीय संघर्षाला धार

पुढारी वृत्तसेवा

BJP should not dare to protest at our office : MP Kale

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाजपने आमच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची हिंमत दाखवू नये, असा इशारा खा. डॉ. कल्याण काळे यांनी रविवारी (दि. १५) टिपू सुलतान वक्तव्यप्रकरणी बोलताना दिला. भाजपकडून काँग्रेस जिल्हा कार्यालयावर निषेध व धरणे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संभाव्य तणाव टळला.

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने रविवारी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या शहागंज भागातील गांधी भवनावर धरणे व निषेध आंदोलन करण्याची तयारी केली. मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तसेच शहागंज परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करत काँग्रेस कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, काँग्रेस कार्यालयात जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिपू सुलतान स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढलेले शासक

या वादावर प्रतिक्रिया देताना खा. डॉ. काळे यांनी टिपू सुलतान हे स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढलेले शासक होते, असे मत व्यक्त केले. तसेच सपकाळ यांनी ऐतिहासिक संदर्भ मांडले असून, भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या कार्यालयावर आंदोलन करण्याची हिंमत भाजपने दाखवू नये, अन्यथा आम्हीही त्यांच्या कार्यालयावर विविध मुद्द्यांवर आंदोलन करू, असा इशारा खा. डॉ. काळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT