वैजापूर : शिंदेच्या आमदाराला आव्हान देण्यासाठी वैजापूरमध्ये ठाकरेंची नवी खेळी पहायला मिळत आहे. माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने दोन दिवसापूर्वी त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर वैजापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ठाकरेंनी शिंदेंच्या आमदाराला पराभूत करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे.
वैजापूर राजकारणातील मोठे नाव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांचा येत्या १५ सप्टेंबरला उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थिती वैजापूरमध्ये ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे वृत आहे. या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंची एक वैजापूरमध्ये सभा आयोजित केली आहे. त्या सभेचे पेंडॉल टाकण्याचे कामही आता सुरू झाले असून. डॉ.दिनेश परदेशी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
सन २००१ पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डाॅ. परदेशींची एकहाती सत्ता राहिली आहे. तसेच परदेशींनी काँग्रेस कडून यापूर्वी दोनदा विधानसभा लढवली आहे. या दोन्हीही निवडणुकीत परदेशींना अगदी थोडक्या मताने पराभवाच्या छायेत राहावे लागले आहे. तसेच शिंदेचे विद्यमान आमदार बोरनारे यांना आव्हान उभे करणाऱ्या उमेदवारांच्या यादीत परदेशींचे नाव नेहमी आघाडीवर राहिले आहे.
डॉ. परदेशी यांनी २०१८ ला भाजपात पक्ष प्रवेश केला होता. त्यामूळे वैजापुरात भाजपाला संजीवनी मिळाली होती. तसेच विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना देखील भाजपा महायुतीचा मोठा फायदा मतदार संघात झाला होता. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परदेशींनी माघार घेतल्याने तसेच शिवसेना भाजपा महायुतीमुळे तालुक्यातील छोट्या मोठ्या निवडणुकींमध्ये महायुतीने एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे परदेशींनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने विद्यमान आमदार बोरनारे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. तसेच वैजापूरमध्ये भाजपाला खिंडार पडण्याचे चित्र आहे