छत्रपती संभाजीनगर, परभणी जि.प. मध्ये भाजपचा अध्यक्ष file photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर, परभणी जि.प. मध्ये भाजपचा अध्यक्ष

अविनाश गलांडे, लता वाकळे यांची निवड; दोन जि.प.मध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार दणका

पुढारी वृत्तसेवा

BJP President in Chhatrapati Sambhajinagar, Parbhani ZP

छत्रपती संभाजीनगर/परभणी :

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. या दोन्ही जिल्हा परिषदांत भाजपने चतुराईने राजकीय खेळी करत आपला अध्यक्ष विराजमान केला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला या दोन्ही जिल्हा परिषदांत भाजपने सत्तेपासून दूर ठेवत जोरदार दणका दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे, उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड बिनविरोध झाली. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड झाली.

छत्रपती संभाजीनगरात भाजपची बाजी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची विशेष सभा बुधवारी (दि. १८) पार पडली. जिल्हा परिषदेच्या ६३ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे सर्वाधिक २३ सदस्य आहेत. तर शिंदे सेनेकडे २१, ठाकरे सेनेकडे ९, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४, प्रहार पक्षाचा १, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा १ आणि ४ अपक्ष सदस्यांचा समावेश होता. शिवसेना-भाजप एकत्रितपणे सत्ता मिळविणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, ऐनवेळी दोन्ही पक्षांत सुरुवातीची अडीच वर्षे अध्यक्ष कुणाचा, या मुद्द्यावरून बिनसले. शिंदे सेनेने ठाकरे सेनेला गळ घातली. मात्र, त्यांचेही काही सदस्य भाजपच्या गोटात गेले. त्यामुळे ठाकरे सेनेने ऐनवेळी 'व्हिप' बजावत या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली यानंतर शिंदे सेनेने निवडणूक सभेवर बहिष्कार टाकला. केवळ भाजपकडून अध्यक्षपदासाठी गलांडे आणि उपाध्यक्षपदासाठी जैस्वाल यांचेच एकेक अर्ज दाखल झाले. परिणामी, ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसने खंजीर खुपसल्याचा शिंदे सेनेचा आरोप

परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अगोदर शिंदेंच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजेश विटेकर यांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप २४ जागा पटकावत सर्वाधिक मोठा पक्ष बनला होता.

निवडणूक निकालानंतर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचे जाहीरही केले होते. दरम्यान, भाजप व शिंदे सेना यांच्यातील बोलणी फिस्कटली होती. नंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करत शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचे आ. राजेश विटेकर यांनी सांगत सर्व भाजप विरोधकांची मोट बांधली होती. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या एक दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळवले आहे.

शिवसेना शिंदे गट जि.प. सत्तेतून बेदखल

छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यात ग्रामीण भागात एकूण सहा आमदार आहेत. त्यात शिंदे सेनेच्या चार आणि भाजपच्या दोन आमदारांचा समावेश आहे. मात्र, भाजपने शह दिल्याने चार आमदार असूनही शिंदे सेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बेदखल व्हावे लागले आहे. दरम्यान, आता भाजप आणि शिंदे सेना दोघांकडून एकमेकांवर विश्वासघात केल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT