सिल्लोड :सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच वरचढ ठरली असून, सिल्लोड-सोयगाव पंचायत समितीवर वर्चस्व राखले आहे. सिल्लोड पंचायत समितीच्या 18 पैकी 10 जागा तर सोयगावच्या 6 पैकी 3 जागा भाजपने काबीज करीत सत्ता अधोरेखित केली. सोयगाव पंचायत समितीत शिवसेनेला 1 तर दुसऱ्या शिवसेनेला (उबाठा) 2 जागा मिळाल्या. सोयगाव पंचायत समितीत भाजप पक्ष वरचढ ठरला असून, सत्तेचे गणित जुळवणे त्यांच्यासाठी कठीण नाही. सिल्लोड-सोयगाव पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता होती.
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात 11 गट, तर 22 गण आहेत. सोयगावचा 1 गट व 2 गण हे कन्नड विधानसभा मतदारसंघात आहेत. यात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील 11 गटांपैकी 6 गटांत शिवसेनेचे, तर 5 गटांत भाजपचे उमेदवार निवडून आले. सिल्लोड पंचायत समितीत 18 पैकी 10, तर सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पंचायत समितीच्या 4 जागांपैकी 3 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघातील 1 गट व 2 गणांत शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार निवडून आले आहे.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील 11 गटांतून शिवसेनेला 1 लाख 14 हजार 92 मते मिळाली, तर भाजपला 1 लाख 14 हजार 950 मते मिळाली. शिवसेनेचा 1 जिल्हा परिषद सदस्य अधिकचा निवडून आला असला तरी सिल्लोड, सोयगाव पंचायत समितीतील सत्ता मात्र राखता आली नाही.
एकंदरीत शिवसेनेचे आ. अब्दुल सत्तार व भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व शिवसेनेच्या नेतृत्वावर काहीसे वरचढ ठरल्याचे चित्र निकालावरून दिसून येते. या निवडणुकीत घाटनांद्रा, शिवणा गट शिवसेनेने भाजपकडून हिसकावले, तर नव्याने निर्मिती झालेल्या अंभई गटात आमदारांचे सुपुत्र अब्दुल आमेर यांनी शिवसेनेचा झेंडा रोवला.
उंडणगाव, भराडी या शिवसेनेच्या गटांना सुरुंग लावत भाजपने बाजी मारली. उंडणगाव गटातून डॉ. सचिन वाघ या उच्चशिक्षित तरुणाला मतदारांनी संधी दिली. तर भराडी गटातून सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्या पत्नी आशा गाढे यांना मतदारांनी मिनी मंत्रालयाची दारे उघडून दिली. तर बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे यांचा मात्र पंचायत समिती गणातून पराभव झाला.
मोठे,तायडेंनी गड राखला
तालुक्याचे लक्ष लागलेल्या केऱ्हाळा गटातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे यांच्या पत्नी अनिता मोठे तिसऱ्यांदा विजयी झाल्या. सलग दीड दशकापासून या गटावर ज्ञानेश्वर मोठे यांचे वर्चस्व आहे. अंधारी गटातून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या पत्नी मंगला तायडे दुसऱ्यांदा विजयी झाल्या. केऱ्हाळा गटात चुरशीच्या लढतीत मोठेंनी गड सर केला. तर अंधारीचा गड शिवसेनेचे तायडेंनी राखला.