BJP claims the post of ZP president
शुभम चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणुकीत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र येत अध्यक्षपदासाठी युती करणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सर्वाधिक जागा मिळाल्याच्या जोरावर अध्यक्ष आमचाच होईल, अशी ठाम भूमिका भाजपने घेतल्याने सत्तास्थापनेची समीकरणे अचानक बदलली आहेत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष म्हणून, तर शिवसेनेने २१ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या बहुमतासाठी पुरेशी असल्याने युती निश्चित मानली जात होती. मात्र अध्यक्षपदासाठी युतीबाबत अद्याप दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.
भाजपने अध्यक्षपदावर दावा कायम ठेवल्याने चर्चाना नवे वळण मिळाले आहे. विशेषतः भाजपकडून शिवसेनेशी संपर्क साधण्यात आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसून, आम्हीही संपर्क साधलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
या अनुषंगाने भाजप शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करणार की इतर पक्षांना सोबत घेऊन अध्यक्षपद काबीज करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच शिवसेना इतर पक्षांना सोबत घेत २०१७ ची पुनरावृत्ती करत सत्तेची चावी हातात घेणार का, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.
आगामी काही दिवसांत सुरू होणाऱ्या राजकीय डावपेचांत कोण वरचढ ठरते आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण गटाला तब्बल साडेआठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे. या संधीमुळे इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत.
निवडणुकीत मोठा पक्ष ठरलेल्या भाजप आणि दोन नंबरचा पक्ष असलेल्या शिवसेनेतील किमान ८ ते १० ज्येष्ठ सदस्य या पदासाठी इच्छुक आहेत. दोन्ही पक्षांत आपल्या वरिष्ठ राजकीय नेत्यांकडे अध्यक्षपद मिळावे, यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या दावेदारांमुळे पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
निर्णय पक्षाचे मुख्य नेते घेतील ! पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल. आम्ही कोणत्याही पक्षाशी संपर्क साधलेला नाही आणि आमच्याशीही कोणी संपर्क केलेला नाही. तसेच भाजपने यांच्याशीही कोणतीही चर्चा किंवा संपर्क केलेला नाही.संजय शिरसाट, पालकमंत्री तथा शिवसेना नेते
अध्यक्ष भाजपचाच होईल जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आमचे वरिष्ठ नेते युतीबाबत चर्चा करणार आहेत. मात्र मतदारांनी आम्हाला साथ दिली असून, एक नंबरचा पक्ष ठरवले. तसेच आता जनतेची इच्छा आहे की? अध्यक्ष भाजपचा व्हावा. त्यामुळे अध्यक्ष भाजपचा होईल यात शंका नाही.- संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष भाजप