Birth and death certificate distribution stopped
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरणातील घोळ समोर आल्यानंतर राज्य सरकारने ही प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली. तेव्हापासून छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय कार्यालयात जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरणाचे काम जवळपास बंद झाले आहे. परिणामी, नागरिकांना खेट्या माराव्या लागत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही पुढच्या दाराने प्रमाणपत्रे मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एक वर्षाहून अधिक विलंब झाल्यानंतर जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. संबंधितांनी अर्ज सादर केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून एस.डी.ओ. हे दाखले जारी करण्यासाठी आदेश देतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात सबळ पुराव्यांशिवाय अशी हजारो प्रमाणपत्रे दिली गेल्याचा आणि त्याचा लाभ बांगलादेशी नागरिकांनी घेतल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता.
त्यांनी विविध शहरात जाऊन काही पुरावेही सादर केले. त्यानंतर राज्य सरकारने या कार्यपद्धतीत काही बदल केले. आता जन्म मृत्यू प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पुरावा म्हणून चौदा प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून जन्म मृत्यू प्रमाणपत्रे देणे जवळपास थांबविले आहे.
शासनाच्या कडक नियमांमुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दाखले देण्यास नकार दिला आहे. दाखला दिल्यानंतर चौकशी होऊन आपल्यावरच कारवाई होईल, या भीतीने अनेक अधिकारी अर्ज नामंजूर करत आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय वाढली आहे. कागदपत्रांची पुर्तता करुनही पुढच्या दाराने दाखले मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने १३२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे बेकायदा दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. त्यात वरील बाब समोर आली. आता या दाखल्याच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.