Bhondubaba viral news Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

काठीने मारहाण, तोंडात बूट धरण्याची शिक्षा; छ. संभाजीनगरमध्ये भोंदूबाबाच्या अघोरी 'उपचारां'चा व्हिडिओ व्हायरल

Bhondubaba viral news: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल; संतापजनक प्रकाराने जिल्ह्यात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर: विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे, हे दाखवणारा एक संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून समोर आला आहे. तालुक्यातील शिऊर गावात एक भोंदूबाबा 'उपचार' करण्याच्या नावाखाली असहाय्य स्त्री-पुरुषांना अमानुष मारहाण करत होता. इतकेच नव्हे, तर त्यांना स्वतःचा बूट तोंडात धरून मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची शिक्षा देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, हा भोंदूबाबा स्वतःला सिद्धपुरुष भासवून लोकांच्या समस्या दूर करण्याचा दावा करत होता. मूल होत नसलेल्या महिला, विवाह जमत नसलेले तरुण, दारूच्या आहारी गेलेले पुरुष किंवा अंगात भूतबाधा असल्याचा दावा करणारे नागरिक त्याच्याकडे येत असत. हा बाबा त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अघोरी 'उपचार' करायचा.

श्रद्धेच्या नावाखाली चाललेला क्रूर खेळ कॅमेरात कैद

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो लोकांना काठीने मारहाण करताना, झाडाची पाने खायला देताना आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, स्वतःचा बूट त्यांच्या तोंडात धरून मंदिराभोवती फेऱ्या मारायला लावताना स्पष्ट दिसत आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा क्रूर खेळ कुणीतरी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली.

अंनिसच्या पुढाकारानंतर गुन्हा दाखल

हा व्हिडिओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत या भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या अघोरी प्रकाराची चौकशी सुरू केली असून, संबंधित बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे समाज प्रगती करत असताना दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. परिस्थिसमोर हतबल नागरिकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा भोंदूबाबांपासून समाजाने सावध राहावे, असे आवाहन देखील या निमित्ताने केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT