Bhildari wireman electric shock death 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | भिलदरी येथे वीजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू, लाईन दुरुस्तीचे काम सुरू असताना घडली घटना

Bhildari wireman electric shock death- पोलवरच बसला विजेचा धक्का; शफेपूर परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

पिशोर : कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या लाईनमनसोबत गेलेल्या शफेपूर येथील ५५ वर्षीय झिरो वायरमनचा वीजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कृष्णा काळूबा मोकासे (वय ५५, रा. शफेपूर, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्या झिरो वायरमनचे नाव आहे. या घटनेमुळे शफेपूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महावितरणचे कनिष्ठ अभियंता के. एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा मोकासे हे महावितरणचे लाईनमन सतीश मुरमुडे यांच्यासोबत भिलदरी येथे वीजवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी गेले होते. या कामासाठी आवश्यक परवानगी (परमिट) घेण्यात आली होती.

दुरुस्तीचे काम सुरू असताना कृष्णा मोकासे हे पोलवर चढून काम करीत होते. त्याचवेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागताच ते पोलवरून खाली जमिनीवर कोसळले. घटनेनंतर लाईनमन सतीश मुरमुडे यांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांनी तपासणी केल्यानंतर कृष्णा मोकासे यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पिशोर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पिशोर पोलिस करीत आहेत.

दरम्यान, वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शफेपूर परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT