कन्नड तालुक्यातील भिलदरी तांडा येथे स्मशानभूमी शेड नसल्याने असे उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (दुसऱ्या छायाचित्रात) रस्त्याची झालेली दुरवस्था. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News: वृद्ध महिलेचा मृतदेह खांद्यावर नेत नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार

भिलदरी तांडा येथे रस्ता, स्मशानभूमी नसल्याने सुविधांच्या अभावाची शोकांतिका

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यातील भिलदरी तांड्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अंत्यविधीसाठी गैरसोय होत आहे. रस्ता व स्मशानभूमीची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना एका वृद्ध महिलेचा मृतदेह खांद्यावर घेऊन मोठा फेरा मारून पायपीट करत नदीकाठी उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागले.

भिलदरी तांडा येथील रहिवासी रेशीबाई रतन राठोड (६५) यांचे रविवारी (दि.१२) वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी (दि.१३) अंत्यसंस्कारासाठी निघाल्यानंतर तांड्यातून स्मशानभूमीकडे जाणारा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झाल्याने तेथून जाणे अशक्य झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी भिलदरी फाटा, पूल व गडगड नदीमार्गे मोठ्या अंतराचा पर्यायी मार्ग स्वीकारला. तांड्यावर स्मशानभूमी, शेड किंवा ओट्याची सुविधा नसल्याने अखेर नदीकाठी मोकळ्या जागेत चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकांच्या काळात रस्ता व स्मशानभूमी उभारण्याची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम होत नाही. परिणामी, पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.या घटनेमुळे भिलदरी तांड्यातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने पक्का रस्ता, सुसज्ज स्मशानभूमी व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भिलदरी तांडा गावात स्मशानभूमी साठी हक्काची जागा नसून, नदीकाठी उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जातात. तर त्या नियोजित जागेवर जाण्यासाठी रस्तासुद्धा बरोबर नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह घेऊन फेरा मारून जावे लागले. जिवंतपणी नाही तर मरणानंतर तरी माणसाची विटंबना थांबली पाहिजे यासाठी स्मशानभूमी व रस्ता ही सुविधा द्यावी.
ऋषिकेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, भिलदरी तांडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT