संतप्त नातेवाइकांनी जावयाच्या घराला आग लावून घर जाळून खाक केले. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar violence : तडजोडीच्या पैशावरून वाद; जावयाच्या वडिलांना मारहाण, घरही जाळले

भालगाव : तीन घरे जळून खाक, नऊ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : तडजोडीच्या पैशांच्या वादातून भालगाव येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेसहाच्या सुमारास जावयाच्या वडिलांना गावात ओढत नेऊन बेदम मारहाण करत त्यांचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाली असून, याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल भीमराव साळुंके (३०,रा. भालगाव) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या लहान भावाचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला होता. मात्र, पती-पत्नीतील वादानंतर पत्नी माहेरी (पिसगाव) राहते. मंगळवारी सकाळी साळुंके कुटुंबीय घरी असताना, भावाच्या पत्नीचे नातेवाईक काकासाहेब धुमाळ, पांडुरंग कानडे यांच्यासह ९ जण जीपमधून तिथे आले. तडजोडीचे पैसे का दिले नाहीत? असा जाब विचारत त्यांनी भीमराव साळुंके यांना लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीपमध्ये बसवून गावात नेले व तिथेही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

डिझेल टाकून पेटवली घरे

मारहाणीवरच न थांबता, आरोपी अशोक सुरसे याने जीपमधील डिझेल आणून घरावर फेकले, तर पांडुरंग कानडे याने चुलीतील जळते लाकूड फेकून घराला आग लावली. यात तीन घरे, धान्य, रोकड आणि संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमी भीमराव यांना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक सलीम चाऊस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT